Vijay wadettiwar | ‘….तरच अजित पवार मुख्यमंत्री होतील’, भाजपाने ‘ही’ अट ठेवल्याचा विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
Vijay wadettiwar | विजय वडेट्टीवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी राजकारणात एक मोठा दावा केलाय. काका-पुतण्याच्या पुण्यात झालेल्या भेटीवर ते काय म्हणाले? हे जाणून घ्या.
मुंबई : काँग्रेस आमदार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीची चर्चा आहे. मागच्या आठवड्यात पुणे कोरेगाव पार्क येथे एका व्यावसायिकाच्या बंगल्यात ही भेट झाली होती. या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेबद्दल विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. इंडियामधील काँग्रेस आणि ठाकरे गटाने आपआपली चिंता व्यक्त केली होती.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार यांनी या भेटीचे राजकीय अर्थ काढू नका. ही कौटुंबिक भेट आहे, असं सांगितलं. आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या भेटीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दावा केलाय.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
“शरद पवार सोबत आल्यास अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देणार अशी भाजपाने अट ठेवली आहे” असा विजय वेडड्टीवार यांनी दावा केलाय. “अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. पण शरद पवार सोबत आल्यास अजित पवार यांना मुख्यमीपद दिल जाईल अशी भाजपाची अट आहे” असा विजय वडेट्टीवार यांनी दावा केला.
‘धीर धरला पाहिजे’
“ते काका-पुतणे आहेत. भूमिका स्पष्ट करतील. धीर धरला पाहिजे. मी संभ्रम म्हणणार नाही. यात कोणाची तरी गरज आहे, जो भेटायला जातो त्याची गरज आहे. यांना मुख्यमंत्री व्हायच असेल, पवारसाहेब सोबत आले तरच करु. नाहीतर तुम्ही मुख्यमंत्रीपदाची स्वप्नच बघा, असं कदाचित ते म्हणाले असतील. म्हणून हे भेटले असतील” असं विजय वडेट्टीवार म्हणाले. ‘इथे फक्त महत्त्व खुर्चीला’
“सत्तेसाठी आणि ती टिकवण्यासाठी हा सर्व खटाटोप चालला आहे. विचार, विकासाला तिलांजली दिली आहे. इथे महत्त्व खुर्चीला आहे:” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.