माफी मागणार नाही, मी जे बोललो ते …; वादग्रस्त वक्तव्यानंतरही भाई जगताप भूमिकेवर ठाम
काँग्रेस नेते भाई जगताप यांनी निवडणूक आयोगाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने खळबळ माजली आहे. त्यांच्या या विधानाचा अनेकांनी निषेध केला आहे.निवडणूक आयोगाने जगतापांविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी शिवसेना नेत्याने केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दणकून पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या ( मविआ) नेत्यांनी निवडणूक आयोगवर सडकून टीका केली आहे. एकीकडे एमव्हीएचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर (ईव्हीएम) सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर शुक्रवारी निवडणूक आयोगावर टीका करताना काँग्रेस नेते आणि आमदार भाई जगताप यांची जीभ घसरली. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट), भाजपासह संपूर्ण विरोधी पक्षांनी जगताप यांच्या वक्तव्याचा कडाडून निषेध करत माफी मागण्याची मागणी केली आहे. मात्र काँग्रेस नेते भाई जगताप हे मात्र त्यांच्या वक्तव्य़ावर ठाम असून माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगत त्यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दर्शवला.
निवडणूक आयोगासंबंधी केलेलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस नेते भाई जगताप म्हणाले की, मी अजिबात माफी मागणार नाही, अगदी एकदाही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्र्यांच्या दबावाखाली आयोग काम करत असेल, तर मी जे बोललो ते बरोबर आहे. मी माफी मागणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. निवडणूक आयोग देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी असतो, कोणाचीही सेवा करण्यासाठी नाही. मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे. टी.एन. शेषन यांनी केलं तसं काम निवडणूक आयोगाने काम केलं पाहिजे, असे भाई जगताप म्हणाले.
#WATCH | Mumbai, Maharashtra: On his “kutta” remark for Election Commission, Congress leader Bhai Jagtap says, “I will not apologise at all, not even a bit…If they are working under pressure from the PM and other ministers then what I have said is right. I will not… pic.twitter.com/xmJ9cfUgas
— ANI (@ANI) November 29, 2024
काय होतं भाई जगताप यांचं वक्तव्य ?
काँग्रेस नेते भाई जगताप यांनी निवडणूक आयोगावर टीका करताना श्वानाची उपमा दिली होती. ‘आपली लोकशाही इतकी मोठी आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे जर लोकशाहीवर काही प्रश्न उपस्थित होत असतील, काही शंका असतील तर त्याचं उत्तर हे निवडणूक आयोगाला आणि सरकारला द्यावंच लागेल. निवडणूक आयोग श्वान आहे. जेवढ्या काही संस्था आहेत या सर्व संस्था श्वान होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगल्याबाहेर बसल्या आहेत. ज्या संस्था आपल्या लोकशाहीला मजबूत बनवण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, त्याचं असं वागत आहेत’ असं वक्तव्य जगताप यांनी केलं होतं. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच गदरोळ माजलाय.
भाई जगताप यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी
जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. भारतीय निवडणूक आयोग हा घटनात्मक अधिकार आहे. भाई जगताप यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केली. असे वक्तव्य केल्याप्रकरणी जगताप यांनी माफी मागितली पाहिजे. तर जगतापांचं बोलणं हे वाचाळवीरांसारखं आहे . तेच भुंकताना दिसत आहेत असे टीकास्त्र प्रवीण दरेकर यांनी सोडलं.