मोठी बातमी! सांगलीच्या जागेचा तिढा वाढला, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आक्रमक
सांगली लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला आहे. ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेसाठी उमेदवारही जाहीर करण्यात आला आहे. पण सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने ही जागा काँग्रेसलाच मिळावी, अशी आमदार विश्वजीत कदम यांची मागणी आहे. या मागणीसाठी आता विश्वजीत कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
महाविकास आघाडीत अजूनही 13 जागांवर तिढा कायम आहे. विशेष म्हणजे सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत सांगलीच्या उमेदवाराचंदेखील नाव आहे. ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हे या जागेसाठी आग्रही आहेत. सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेससाठी सुटावी, अशी विश्वजीत कदम यांची मागणी आहे. विश्वजीत कदम यांनी यासाठी दिल्लीत जावून काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबतही चर्चा केली. पण अद्यापही सांगलीच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. याबाबत कोणत्याही हालचाली घडत नसल्यामुळे अखेर विश्वजीत कदम आक्रमक झाले आहेत.
विश्वजीत कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहित मोठा इशारा दिला आहे. काँग्रेसच्या राज्य प्रचार निवड आणि बैठकीवर बहिष्काराचा इशारा विश्वजीत कदम यांनी दिला आहे. ते काँग्रेस राज्य प्रचार निवड बैठकीला गैरहजर राहणार आहेत. सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नसल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली आहे.
विश्वजीत कदम यांची काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीच्या सदस्य पदी 30 मार्चला निवड करण्यात आली आहे. पण विश्वजीत कदम यांची सांगलीच्या जागेबाबत ठाम भूमिका आहे. जागेचा तिढा सुटत नसेल तर काँग्रेसच्या बैठकीला येणार नसल्याचा पवित्रा कदम यांनी घेतला आहे. आमदार विश्वजीत कदम यांची येत्या 3 एप्रिलला मुंबईत दुपारी 1 वाजता होणाऱ्या प्रचार समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका आहे. याबाबत त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी सांगलीच्या जागेबाबत काय निर्णय घेतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विश्वजीत कदम पत्रात नेमकं काय म्हणाले आहेत?
“नाना गावंडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचे दिनांक ३० मार्च रोजीचे काँग्रेस राज्य प्रचार समितीच्या निवडीचे व बैठकीचे पत्र मला मिळाले. आपण माझी प्रचार समितीच्या सदस्यपदी निवड केली त्याबद्दल मी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी, महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेनिथलाजी आणि आपला मनापासून आभारी आहे. राज्यात आगामी लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण ताकदीने लढवणारच आहोत. माझी आणि सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची सांगली लोकसभेच्या जागेबाबतीत असणारी भावना आपण जाणत आहात”, असं विश्वजीत कदम पत्रात म्हणाले आहेत.
“गेल्या काही दिवसांपासून सांगली व राज्यातील इतर काही लोकसभेच्या जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवण्यास सक्षम आहे. या भूमिकेवरती मी व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते आज ही ठाम आहे. तसेच अद्याप ही सांगली लोकसभा जागेबाबतीत काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला कोणताही निर्णय कळविलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व आमदार म्हणून मी या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. आपण दिलेल्या संधीबद्दल मी आपला आभारी आहे”, अशी भूमिका विश्वजीत कदम यांनी पत्रात मांडली आहे.