“चैत्यभूमीवर येऊन नाक घासून माफी मागा, अन्यथा…”, राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप आक्रमक
"आता राहुल गांधी यांनी संविधानाचा अपमान केला आहे, त्याची त्यांनी माफी मागावी. यावर मनोज जरांगे काय बोलतात, त्यासाठी मी उत्सुक आहे", असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
Rahul Gandhi Should Apologize : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर आज राज्यभर भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर यांसह संपूर्ण महाराष्ट्रात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. यावेळी राहुल गांधी यांच्याविरोधात मोठ्या घोषणाबाजीही करण्यात आल्या. मुंबईत घाटकोपर परिसरात भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी पंकजा मुंडे यांनी राहुल गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी, अन्यथा आमचे आंदोलन सुरुच राहील, अशी मागणी केली.
पंकजा मुंडे आणि आशिष शेलार यांनी घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात आंदोलन केले. यावेळी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात आला. “आम्ही राहुल गांधींचा धिक्कार आणि निषेध करतो. राहुल गांधी हे जोपर्यंत माफी मागत नाही, तोवर आमचे आंदोलन सुरु राहील. त्यांनी आपल्या संविधनाचा अपमान केला आहे. त्यावर राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं. राहुल गांधी यांच्या विधानाचा मी निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला, तेव्हा मोदींनी माफी मागितली, आता राहुल गांधी यांनी संविधानाचा अपमान केला आहे, त्याची त्यांनी माफी मागावी. यावर मनोज जरांगे काय बोलतात, त्यासाठी मी उत्सुक आहे”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
“चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी”
तर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी “चैत्यभूमीवर येऊन नाक घासून माफी मागेपर्यंत आमचं आंदोलन सुरु राहील. आरक्षणला मोडीत काढणारे वक्तव्य सर्वानी पाहिलं आहे. यावर उद्धव ठाकरे, शरद पवार भूमिका घेणार का? मनोज जरागे यांची भूमिका काय आहे? राहुल गांधी यांनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी, अन्यथा आमचे आंदोलन सुरु राहील”, असे आशिष शेलार यांनी म्हटले.
राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक
त्यासोबतच राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने राज्यभर आंदोलन केले. पुण्यात भाजपच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करणार आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पुण्यासोबतच नाशिकमध्येही भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले गेले. नाशिकच्या शालिमार परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारतातील आदिवासी आणि दलित समाज तसेच मागास समाजाच्या आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन केले.
तसेच धुळ्यातही राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चप्पल मारण्यात आले. यासोबतच राहुल गांधींच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर सोलापुरात भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले होते. भाजप पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करत राहुल गांधींचा निषेध व्यक्त करण्यात आला.