सर्वात मोठी बातमी ! उत्तर मुंबईत उमेदवार आयात करणार?; काँग्रेसकडून ठाकरे गटाच्या महिला नेत्याला उमेदवारी?
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राज्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी उमेदवार बदलले जात आहेत. तर काही ठिकाणी उमेदवारीच रद्द केली जात आहे. विविध पक्षांकडून परिस्थितीचा अंदाज घेऊन पावलं टाकली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतूनही एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट येणार आहे.
महाविकास आघाडीतील एक मोठी बातमी आहे. काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या उत्तर मुंबईच्या जागेबाबत आज दिल्लीत खलबतं झाल्याची चर्चा आहे. काँग्रेस उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पक्षातून कुणालाच उमेदवारी देणार नाही. ठाकरे गटातून उमेदवार आयात करून काँग्रेस हा जागा लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या महिला नेत्याला ही उमेदवारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या एक दोन दिवसात याबाबतचा निर्णय होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार आयात करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्विनी घोसाळकर यांना काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी दिली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाच्या इतर नेत्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला जाणार आहे. या मतदारसंघातून तेजस्विनी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार होत्या. तेजस्विनी यांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहेत तेजस्विनी घोसाळकर?
तेजस्विनी घोसाळकर या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. तेजस्विनी या नगरसेविका होत्या. त्यांनी नगरसेविका म्हणून मतदारसंघात चांगली कामे केली होती. नागरिकांच्या समस्यांची जाण असलेल्या नेत्या म्हणून त्या लोकप्रिय आहेत.
विनोद घोसाळकर इच्छूक
दरम्यान, उत्तर मुंबईतून निवडणूक लढण्यासाठी विनोद घोसाळकर इच्छूक होते. त्यासाठी ठाकरे गटाने या जागेसाठी काँग्रेसकडे मागणीही केली होती. पण काँग्रेसने ही जागा ठाकरे गटाला सोडायला नकार दिला. मात्र, काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांनी घोसाळकर यांना पंजा निशाणीवर निवडणूक लढण्याची अट ठेवली होती. पण घोसाळकर यांनी आपण कट्टर शिवसैनिक असल्याचं सांगत काँग्रेसची ऑफर नाकारली होती. स्वत: घोसाळकर यांनीच याबाबतची माहिती दिली होती. मात्र, आता काँग्रेस विनोद घोसाळकर यांनाच काँग्रेसमध्ये घेऊन तिकीट देणार असल्याचं सांगितलं जात आहे.
नाराजी कळवली
दरम्यान, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड आज दिल्लीत गेल्या होत्या. यावेळी त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन राज्यातील जागा वाटपावर नाराजी व्यक्त केली. या भेटीत मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणवर चर्चा झाली. संघटनेचे प्रमुख पदाधिकारी म्हणून काँग्रेस अध्यक्षांना भेटलो. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते, भावना अध्यक्षांना कळवल्या. पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत या संदर्भात चर्चा झाली. पक्षाध्यक्षांना मुंबई, महाराष्ट्राची माहिती आहे. आम्ही त्यांना आमच्या भावना कळवल्या आहेत, ते योग्य निर्णय घेतील. मुंबईतील सर्व सहाच्या सहा जागा आम्ही जिंकू असा विश्वास आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.