निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगतापांची जीभ घसरली; श्वानाची उपमा, म्हणाले..

| Updated on: Nov 29, 2024 | 8:17 PM

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्यानं ईव्हीएम मशीवर शंका उपस्थित केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेस नेते भाई जगताप यांनी निवडणूक आयोगाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगतापांची जीभ घसरली; श्वानाची उपमा, म्हणाले..
Follow us on

विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला, तीन प्रमुख घटक पक्ष शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या, मात्र दुसरीकडे महायुतीला मोठ यश मिळालं. 132 जागांवर विजय मिळून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला तर शिवसेना शिंदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटला 41 जागा मिळाल्या. दरम्यान विधानसभा निवडणूक निकालानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करत निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेस नेते भाई जगताप यांची जीभ घसरली आहे, त्यांनी निवडणूक आयोगावर टीका करताना श्वानाची उपमा दिली, भाई जगताप यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले भाई जगताप? 

‘इतकी मोठी आपली लोकशाही आहे, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे जर लोकशाहीवर काही प्रश्न उपस्थित केले जात असतील, काही शंका असतील तर त्याचं उत्तर हे निवडणूक आयोगाला आणि सरकारला द्यावंच लागेल. निवडणूक आयोग श्वान आहे. जेवढ्या काही संस्था आहेत या सर्व संस्था श्वान होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगल्याबाहेर बसल्या आहेत. ज्या संस्था आपल्या लोकशाहीला मजबूत बनवण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, त्याचं असा व्यवहार करत आहेत.’ असं वक्तव्य भाई जगताप यांनी केलं आहे. भाई जगताप यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 दरेकरांची प्रतिक्रिया

दरम्यान दुसरीकडे भाई जगताप यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.  ‘मला वाटतं वाचाळविरांसारखं बोलणं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सुरू आहे. आणि त्यामुळे तेच इथे भुंकताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने त्यांना तसेच दिसणार’ अशी प्रतिक्रिया यावेळी दरेकर यांनी दिली आहे.