कुणाल कामराच्या व्हिडीओवरून वाद; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया, कोणाला सुनावलं?
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिका केली आहे. यावरून चांगलाच वाद झाला. यावर आता अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिका केली आहे. यावरून चांगलाच वाद झाला. शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. कुणाल कामराने या प्रकरणात माफी मागावी अशी मागणी होत आहे. यावर आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कुणाल कामरा हा कॉमेडियन आहे, तो जे बोलला ते कॉमेडियनकडून अपेक्षित नाही, मात्र नंतर वापरलेली शिवराळ भाषा आणि तोडफोड देखील योग्य नाही, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या दमानिया?
कुणाल कामरा हा कॉमेडियन आहे, तो जे बोलला ते कॉमेडियनकडून अपेक्षित नाही, मात्र नंतर वापरलेली शिवराळ भाषा आणि तोडफोड देखील योग्य नाही. कुणालला असं काही बोलण्याची काहीच गरज नव्हती. शिंदे यांच्या पक्षाला ठणकावून सांगायचं आहे की आता बास. तोडफोडीची वसुली झाली पाहिजे. कोरटकर चिल्लर माणूस आहे ,असं म्हणणारे मुख्यमंत्री त्याला का पाठीशी घालत आहेत ? हे सगळं खालच्या दर्जाचं राजकारण सुरू आहे. गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. कारवाई का होतं नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगवं. निरुपम, राणे यांच्याकडून गुंडगिरीची भाषा वापरली जाते. ही भाषा, दादागिरी कधी बंद होणार? असं आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना वाटतं असं दमानिया यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मला काही पत्रकारांकडून माहिती मिळाली 22 तारखेला नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. तो विषय बाजूला करण्यासाठी तर असं बोलून घेतलं नसेल ना ? हे राजकारण खूप खालच्या स्तराला गेलं आहे. कॉमेडियनकडून अशी भाषा बोलून घेतली जात असेल तर हे चुकीचं आहे, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.
दरम्यान संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्यावरून देखील दमानिया यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रश्न असा आहे की 3 महिने उलटले तरी कृष्णा आंधळे फरार कसा आहे? त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची नावं चार्जशीटमध्ये का नाहीत? त्यांना आणखी सहआरोपी केलं गेलेलं नाही, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.