Corona Update | कोरोना देशात पुन्हा पसरतोय हातपाय.. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या किती ?
तीन वर्षांपूर्वीत भारतासह जगभरात धूमाकूळ घालणाऱ्या, लाखो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या, कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. भारतात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
मुंबई | 21 डिसेंबर 2023 : तीन वर्षांपूर्वीत भारतासह जगभरात धूमाकूळ घालणाऱ्या, लाखो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या, कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. भारतात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत नव्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने लोकांचं टेन्शन पुन्हा वाढायला लागलं असून गेल्या काही दिवसापासून देशात आणि महाराष्ट्रातही कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याची चर्चा होती तर आता गोव्यामध्येही करोना विषाणूचा नवा उपप्रकार असलेल्या ‘जेएन १’चे रुग्ण सापडले आहेत.
याच पार्श्वभूमीवर देशभरात आणि महाराष्ट्रातही सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. कारण महाराष्ट्रातही या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. राज्यात काही ठिकाणी नवीन रुग्ण सापडत असले तर दक्षता घ्यावी, मात्र घाबरून जाण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. सर्व लोकांनी बाहेर पडताना, आवश्यकतेनुसार मास्क घालावे, सोशल डिस्टन्सचे पालन करावे आणि वारंवार हात धुवावे, स्वच्छता बाळगावी अशा सूचनाही आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात स्थिती काय ?
संपूर्ण देशभरात कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. देशात सध्या 2311 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. ही वाढती आकडेवारी पाहता महाराष्ट्र सरकारही सावध झालं आहे. गोवा, केरळ आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. WHO च्या म्हणण्यानुसार कोरोनाचा हा व्हायरस लवकर पसरत आहे, जे अत्यंत धोकादायक आहे. महाराष्ट्रात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 45 इतकी आहे. त्यामध्ये मुंबईतील 27, ठाणे 8, रायगड 1, पुणे 8, कोल्हापूरमधील 1 रुग्ण यांचा समावेश आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही कसून तयारी केली असून 17 डिसेंबर रोजी राज्यातील विविध रुग्णालयात तयारीच्या दृष्टीने मॉकड्रिल पार पडलं. JN.1 हा ओमिक्रॉन व्हेरीयंटचा उपप्रकार असून, यामुळे रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहे. त्यामुळे या व्हेरीयंटची भीती बाळगण्याची गरज नाही तथापी कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे, असे आरोग्. विभागातर्फे सांगण्यात आले. या नवीन व्हेरीयंटच्या पाश्र्वभूमीवर सर्व जिल्हयांना दक्षता घेण्याचे कळविले असून रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व जिल्ह्यांना कोविड चाचण्या वाढवण्यास सांगण्यात आले आहे.
जेएन 1 विषाणूचा रुग्ण सापडल्याने पुणे महापालिका अलर्ट मोडवर
दरम्यान कोरोनाच्या जेएन 1 विषाणूचा रुग्ण सापडल्याने पुणे महापालिका अलर्ट मोडवर गेली आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरात कोविड चाचण्या वाढवण्याच्या सूचना दिल्या. तसेच पूर्वतयारी म्हणून महापालिका रुग्णालयात करण्यात मॉकड्रिल करण्यात आले. यावेळी पालिका रुग्णालयात ऑक्सिजन आणि औषधसाठ्याचा आढावा घेण्यात आला.
काय काळजी घ्याल ?
संसर्गजन्य आजार असलेल्या कोरोनाने पुन्हा हातपाय पसरल्याने , त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारने पुन्हा तयारी सुरू केली आहे. पण नागरिकांनी स्वत:ही खबरदारी घेऊन, योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत.
– गरज नसेल तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
– बाहेर जाताना, मास्कचा वापर अवश्य करा.
– वैयक्तिक स्वच्छता बाळगा, हात वारंवार धुवा.
– बर नसेल, सर्दी-खोकला- ताप , काहीही त्रास होत असेल तर दुखणं अंगावर काढू नका, त्वरित डॉक्टरांकडे जा.