मुंबई: बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाने (Corona) पुन्हा तीन हजार रूग्णांचा टप्पा ओलांडला. तर एकाच दिवसात आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. या 3,260 नवीन रुग्णांमध्ये मुंबईतील 1,648 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णांची (Active Corona Patient) संख्या आता 24 हजार 639 वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण बाधितांची संख्या 79,45,022 झाली असून मृतांची संख्या 1,47,892 झाली आहे. दरम्यान 2291 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आलंय. सध्याच्या घडीला मुंबईचा रिकव्हरी रेट हा 97 टक्के असून सक्रिय रुग्णसंख्या 13501 वर पोहोचली आहे. तर मुंबई रुग्ण दुप्पट होण्याचा कालावर 371 दिवसांवर आलाय. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे.
एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या 3659 प्रकरणांच्या तुलनेत बुधवारी राज्यात 399 कमी रुग्ण आढळून आले. राज्यात आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी दोन रुग्णांचा मुंबईत तर रायगडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात BA.5 या उप-प्रकारची सहा नवीन प्रकरणे देखील आढळून आली आहेत. सध्या महाराष्ट्रात 24,639 उपचाराधीन रुग्ण आहेत. ज्यामध्ये राज्यातील सर्वाधिक 13,501 रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. तर ठाण्यात 5,621 रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या आजच्या अहवालात 3,533 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने महाराष्ट्रात बरे झालेल्यांची संख्या 77,72,491 झाली आहे. महाराष्ट्रातील पुनर्प्राप्तीचा दर 97.83 टक्के आहे. मृत्यू दर 1.86 टक्के आहे.
देशभरात कोरोनाचे 9,923 रुग्ण
दरम्यान देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाचे 12249 रुग्ण आढळले आहेत. देशातील सक्रिय प्रकरणे 81 हजारांहून अधिक (81,687 प्रकरणे) वाढली आहेत. इतकेच नाही तर गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 21 जून रोजी देशभरात कोरोनाचे 9,923 रुग्ण आढळले होते. यादरम्यान 17 जणांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत 4,33,31,645 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 5,24,903 लोकांना या साथीने आपला जीव गमवावा लागला आहे. देशात गेल्या 24 तासांत सक्रिय प्रकरणांमध्ये 2374 ची वाढ झाली आहे.