नवी मुंबईत कोरोना धोका वाढला, महापालिका आयुक्तांचे कठोर कारवाईचे आदेश
अनेक ठिकाणी गर्दी वाढत असल्याने नवी मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्येही मोठी गर्दी होते. या ठिकाणी मास्कचा वापर होताना दिसत नाही.
नवी मुंबई : महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक ठिकाणी गर्दी वाढत असल्याने नवी मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्येही मोठी गर्दी होते. या ठिकाणी मास्कचा वापर होताना दिसत नाही. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगही पाहायला मिळत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांत नवी मुबंई परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.(Corona patient increased in Navi Mumbai area)
20 दिवसांत 2 हजार 110 रुग्ण वाढले
फेब्रुवारी महिन्यातील 20 दिवसात नवी मुंबई परिसरात 2 हजार 110 रुग्ण वाढले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 805 वरुन 1 हजार 40 वर पोहोचली आहे. नागरिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियमांमध्ये आणलेली शिथिलता आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेल्यानं नागरिकांमध्ये वाढलेली बेशिस्त यामुळे कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दिवाळी ते 31 जानेवारीदरम्यान होणारी कोरोना रुग्णांची संथ्या कमी होऊ लागली होती. दिघा, इंदिरानगर आणि चिचंपाडा नागरी आरोग्य केंद्राचा परिसर पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. पण 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सुरु झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याचं बोललं जात आहे. एक महिन्यापूर्वी दररोज 40 ते 60 रुग्ण आढळून येत होते. आता मात्र ही संख्या 80 ते 100 वर जाऊन पोहोचली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी 109 रुग्ण आढळून आले आहेत.
कठोर कारवाईचे आयुक्तांचे आदेश
बेलापूर, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे परिसरातील परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्वच बाजारपेठांमध्ये कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन होत आहे. मास्कचा वापर होत नाही. सोशल डिस्टन्सिंगचाही सर्वांना विसर पडला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी आता अधिक कठोर भूमिका घेण्याचं ठरवलं आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश बांगर यांनी दिले आहेत.
संबंधित बातम्या :
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवबंधन बांधलेल्या माजी नगरसेवकाची आत्महत्या, नवी मुंबईत खळबळ
Navi Mumbai Municipal Election : 30 जागा मिळाल्या नाही तर नवी मुंबईत आघाडी अशक्य – काँग्रेस
Corona patient increased in Navi Mumbai area