ना ऑक्सिजन बेड, ना व्हेंटिलेटर, शहर शहर एकच खबर, वाचा महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरात काय स्थिती?
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फक्त रुग्णच वाढत नसून उपचाराच्या सोयीसुविधांचीही कमतरता भासत आहेत. कुठं ऑक्सिजन बेड नाही, तर कुठं व्हेंटिलेटर नाहीये.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फक्त रुग्णच वाढत नसून उपचाराच्या सोयीसुविधांचीही कमतरता भासत आहेत. कुठं ऑक्सिजन बेड नाही, तर कुठं व्हेंटिलेटर नाहीये. अनेक शहरांमध्ये कोरोना लसीचाही साठा संपल्यानं लसीकरण ठप्प झालंय. त्यामुळे एकूणच परिस्थिती चिंताजनक झालीय. राज्यातील याच परिस्थितीचा हा आढावा (Corona Updates of Maharashtra shortage of Oxygen bed Ventilator and Corona Vaccine).
मुंबई आणि परिसर
मुंबईसह राज्यभरात लसीचा तुटवडा आहे. मुंबईनंतर आता ठाण्यातही लसीकरण केंद्र बंद होताना दिसत आहेत. ठाण्यातील महत्वाचे लसीकरण सेंटर म्हणजे कैवशल्या इस्पितळ लसीकरण केंद्र आज बंद झालंय. ठाण्यातील असे अनेक छोटेमोठे लसीकरण केंद्र आज बंद झालीत. नागरिकांना लसीकरण घेण्यासाठी या असे फोन येतात आणि लसीकरण केंद्रावर गेल्यावर त्यांना कळते की लसच नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोना प्रचंड वाढतोय, तर दुसरीकडे अशाप्रकारे लसीकरण बंद झाले तर आपण कोरोनावर अंकुश कसे बसवू शकतो असा सवालच नागरिक विचारत आहेत. आता सोमवारीच ठाणेकरांना लस कधी आणि किती मिळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.
पुणे
पुण्यात सध्याच्या घडीला रुग्णाला व्हेंटिलेटवर ठेवायचे झाल्यास एकही बेड शिल्लक नाही. तर कोरोनाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या ऑक्सिजन बेडसची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण पुणे जिल्ह्यात केवळ 376 ऑक्सिजन बेडस उरले आहेत. व्हेंटिलेटर्स बेडससाठी रुग्ण अक्षरश: वेटिंग लिस्टमध्ये आहेत. एखादा बेड खाली झालाच तर तात्काळ तो भरला जातो. राज्याच्या इतर भागातूनही पुण्यात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा प्रकोप असाच वाढत राहिल्यास काय करायचे, असा प्रश्न प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला पडला आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाकडून लष्कराची मदत मागण्यात आली आहे. पुण्याच्या लष्करी रुग्णालयातील बेडस् उपचारासाठी उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र, लष्कराने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. हे बेडस उपलब्ध झाले तरी त्यांची संख्या 450 इतकीच आहे. त्यामुळे पुण्यात आता युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे.
पुण्यातील कोरोना स्थिती?
पुण्यात बुधवारी दिवसभरात 5 हजार 651 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 4 हजार 361 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात आज दिवसभरात 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 13 जण हे पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 4 लाख 60 हजार 71 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 957 जणांची कोरोना स्थिती चिंताजनक आहे. पुण्यात आतापर्यंत 5 हजार 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील व्हेंटिलेटर बेड्स संपले आहेत. याशिवाय ऑक्सिजन बेड्स आणि आयसीयू बेड्सची उपलब्धता आणि शिल्लक आकडेवारी खालीलप्रमाणे
बेड्स उपलब्ध शिल्लक
ऑक्सिजन बेड्स- 1998 541 आयसीयू बेड्स- 502 116 व्हेंटिलेटर बेड्स- 188 00
सध्या शहरात 25 हजार सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. या ठिकाणी दिवसाला 2500 ते 3000 रुग्ण वाढत आहेत.
नाशिक
नाशिक शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड सुरु आहे. रुग्ण व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने हॉस्पिटलच्या दारोदार फिरत आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांकडून व्हिडीओच्या माध्यमातून मदतीची मागणी करण्यात येत आहे. नाशिक हे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक आहे. नाशिकमध्ये सध्या 19 हजार 735 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. दररोज यामध्ये रुग्णांची वाढ होत आहे. नाशिकमध्ये कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारे व्हेंटिलेटर्स,ऑक्सिजन बेड, रेमडेसिव्हीरची परिस्थिती गंभीर झालीय. नाशिक देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या 10 जिल्ह्यांमध्ये आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर व्हेटिलेटर्स बेड मिळावा म्हणून रुग्णांनी व्हिडीओ शेअर करुन मदत मागितली आहे. यापार्श्वभूमीवर नाशिकमधील रुग्ण राम भरोसे असल्याचं समोर आलं आहे.
नाशिकमध्ये ऑक्सिजन तुटवडा
नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ऑक्सिजन तुटवड्याचं दाहक वास्तव समोर आलं आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेनं अधिग्रहित केलेल्या सुविचार हॉस्पिटलमधील ऑक्सिजन साठा संपला आणि अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. याच रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आणि ऑक्सिजनवर असलेल्या 30 रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना हलवण्याची धावपळ सुरू झाली. अखेर रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी धावपळ करून व्हेंटिलेटर वर असलेल्या 6 रुग्णांना इतरत्र हलवले.
नाशिक शहरामध्ये गुरवारी कोरोना रुग्ण संख्येने आत्तापर्यंतचे सर्व आकडे मागे टाकले असताना शहरांमध्ये बेड, रेमडिसिव्हर आणि लस यांचा तुटवडा तर आहेच. मात्र आता ऑक्सिजनचा देखील तुटवडा वाढल्याने नागरिकांनी जबाबदारी ओळखत प्रशासनाचं काम हलकं करावं अशी मागणी होते आहे.
नाशिकमध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती काय?
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 19735 काल दिवसभरात एकूण मृत्यू – 11 नाशिकमध्ये दररोज साधारण 3500 ते 4000 चाचण्या मृत्यू दर – 3 ते 3.5 टक्के दर रोज लसीकरण – 5500- 6000 नाशिक मध्ये पॉझिटिव्हिटी रेट – साधारण 35% लसीचा साठा – चार दिवस पुरेल इतका लसीचा एकूण साठा – 189360 कोव्हीशिल्ड – 163100 कोव्हॅक्सीन – 26260 ऑक्सिजन साठा – अपुरा
कोल्हापूर
ब्रेक द चेन या नियमानुसार शनिवार आणि रविवार या दोन दिवस कडक लॉकडाऊन असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यात उद्या 2 हजार पोलीस यांच्यासह 500 होमगार्ड रस्त्यावर असणार आहेत. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिले. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर दंडासह गुन्हे नोंद करण्याचा इशारा यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. बलकवडे यांनी दिला आहे. शिवाय अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलंय
नांदेड
नांदेडमध्ये रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा होत असल्याने रुगणांचे हाल होतायत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची समिती नेमलीय. या समितीच्या मार्फतच आता रेमडीसीवर इंजेक्शनचे वितरण करण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संजय कदम यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ही मागणी केली होती. त्यानंतर रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी समिती नेमण्यात आलीय.
जळगाव
राज्यासह जळगाव जिल्ह्यात वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी 30 एप्रिल पर्यत कडक निर्बंध लागू करण्यात आले असून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस संपूर्ण लॉक डाऊन असून मेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, कुणीही विनाकारण बाहेर पडू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.
वाशिम
वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना संर्सग रोखण्यासाठी तातडीच्या उपाय योजना करण्यात येत आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ज्या गावात रुग्णसंख्या वाढते आहे त्या परीसरात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून बॅरीकेट लावत पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. वाशिम तालुक्यात कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. मागील 7 दिवसात 369 रुग्ण आढळले आहेत. त्यात तालुक्यातील उकळीपेन येथे आतापर्यंत गावात 100 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे येथे कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. आरोग्य विभागाने या गावातील कोरोना चाचण्यात वाढ केली आली आहे.
चंद्रपूर
चंद्रपुरात कोरोना उद्रेकामुळे व्हेंटिलेटरयुक्त खाटांची तीव्र टंचाई आलीय. शहरातील केबल ऑपरेटरला बेड न मिळाल्याने त्याचा मृत्यू झालाय. होळीपासून शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या या रुग्णाचा ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज होती. 48 तास प्रतिक्षा करूनही बेड मिळाला नसल्यानं नातेवाईकांची धावपळ सुरु होती. प्रकृती खालावल्यानंतर बेड मिळाल्याने 15 मिनिटातच या रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र आरोग्य अधिकार्यांनी शहर-जिल्ह्यात पुरेसे बेड व अतिरिक्त खाटांची व्यवस्था होत असल्याचा दावा केलाय.
हेही वाचा :
व्हॅक्सीनची कमतरता ही गंभीर समस्या, हा उत्सव नव्हे; राहुल गांधींचा मोदींना टोला
व्हिडीओ पाहा :
Corona Updates of Maharashtra shortage of Oxygen bed Ventilator and Corona Vaccine