जालना: जालन्यात कोरोना रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना रोखण्याकरिता जालन्यासाठी पाचसूत्री कार्यक्रमच दिला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. (coronavirus: Five-point plan ready to contain possible outbreak in jalna)
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी हे आदेश दिले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, डॉ. प्रताप घोडके, डॉ. संजय जगताप, डॉ. संतोष कडले, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, अन्न व औषध प्रशासनविभागाच्या अंजली मिटकर आदी उपस्थित होते.
काय आहे पाचसूत्री कार्यक्रम?
>> आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण 75 टक्क्यांवर करा
>> होमआयसोलेशनपेक्षा संस्थात्मक अलगीकरणावर भर द्या
>> लसीकरणाच्या मोहिमेला अधिक गती द्या
>> मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करा
>> शासकीय व खासगी रुग्णालयातील बेडचे एककेंद्रीय पद्धतीने नियोजन करा
संस्थात्मक अलगीकरणावर भर द्या
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिराने रुग्णालयात भरती होत असल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांची प्रकृती खालावत असून अनेकप्रसंगी रुग्णांचा मृत्यूही होत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. सर्वसामान्य नागरिक सर्दी, ताप, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानाही याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये न ठेवता त्यांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यावर भर देण्यात येऊन कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयसीएमआर यांच्यामार्फत वेळोवेळी दिशानिर्देश देण्यात येत आहेत, याचे तंतोतंत पालन होईल याची खबरदारीही घेण्याच्या सूचना राजेश टोपे यांनी दिल्या.
कोविड सेंटरमध्ये मनुष्यबळ वाढवा
कोरोना बाधित अथवा संशयित रुग्णांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा प्राधान्याने मिळाव्यात. कोविड सेंटरची स्वच्छता दररोज होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जाही उत्तम राहील, याची दक्षता घेण्यात यावी. त्याचबरोबर या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या पद्धतीच्या वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ ठेवण्याबरोबरच नियमितपणे रुग्णांची तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कामगारांची दोन दिवसात भरती करा
कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यादृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या 400 बेडव्यतिरिक्त अधिकच्या 250 ऑक्सिजन बेडची निर्मिती करण्यात आली असून हे बेड रुग्णांसाठी तातडीने उपलब्ध होतील, यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य तसेच डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार यांची येत्या दोन दिवसांमध्ये भरती करण्यात यावी. त्याचबरोबर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या शासकीय व खासगी बेड रुग्णांना विहित वेळेत मिळावेत यासाठी एककेंद्रीय पद्धतीने बेडचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्याच्या सूचना देत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांकडून अधिकचे पैसे तर घेण्यात येत नाही ना याबाबत खात्री करण्यात येऊन रुग्णांकडून उपचारापोटी देण्यात येणारी देयकांची लेखा परिक्षकांमार्फत नियमितपणे तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
टेस्टिंग, ट्रेसिंगवर भर द्या
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य शासनाने अनेक निर्बंध व सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी होईल, यासाठी पोलीस विभागाने काम करावे. तसेच कंन्टेन्टमेंट झोनमध्ये निर्बंधाची अधिक कडकपणे अंमलबाजवणी करण्याबरोबरच मास्क, सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात याव्यात. तसेच जिल्ह्यात ट्रेसिंग व टेस्टींगची संख्या वाढविण्यात यावी. जालना जिल्ह्यासाठी स्वतंत्र अशी आरटीपीसीआर लॅब असून या लॅबची दरदिवसाची क्षमता एक हजारपेक्षा अधिक स्वॅब तपासणीची असून दरदिवशी त्या प्रमाणात चाचण्या झाल्याच पाहिजेच. जिल्हा सामान्य रुग्णालयाव्यतिरिक्त जालना शहरामध्ये अधिक प्रमाणात स्वॅब संकलन केंद्र उघडण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. कोरोना बाधितांच्या संपर्कामधील सहवासितांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात यावा. साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 20 व्यक्तींचा शोध घेण्यात येऊन त्यांचे तातडीने अलगीकरण करण्यात यावे. कोरोना बाधितांच्या सहवासितांचा डेटा नियमितपणे अपलोड होईल, यादृष्टीनेही काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
आरोग्य केंद्रातूनही लसीकरण करा
कोरोनापासुन बचाव होण्यासाठी लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याची गरज असल्याचे सांगत जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या लसीकरण लसीकरण केंद्राच्या संख्येत वाढ करण्याची गरज असून जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रामधूनही लसीकरण करण्यात यावेत. एकूण 170 ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येऊन या केंद्रांच्या माध्यमातून अधिक प्रमाणात लसीकरण करण्यात यावे. 1 एप्रिल पासून 45 वर्षावरील नागरिकांना कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जिल्ह्यात दिलेल्या उद्दिष्टापैकी 75 टक्के लसीकरण दैनंदिन होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना करत सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच संघटनांनी लसीकरणाच्या मोहिमेस गती देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
फायर ऑडिटमधील त्रूटीची पूर्तता करा
जिल्ह्यात रेमेडिसीव्हर इंजेक्शन तसेच ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याचीही काळजी घ्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना अखंडितपणे पाण्याचा पुरवठा व्हावा यादृष्टीने मोठया पाण्याच्या टाकीची उभारणी करुन या टाकीच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा करा. जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, महिला रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे फायर ऑडीट करण्यात आलेले असून या ऑडीटमध्ये काढण्यात आलेल्या त्रुटींची तातडीने पूर्तता करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. (coronavirus: Five-point plan ready to contain possible outbreak in jalna)
ऑक्सिजन व रेमेडिसीव्हरबाबत संपर्क साधा
मेडिकल ऑक्सिजन व रेमेडिसीव्हर इंजेक्शन या औषधांचा पुरवठा सुरळीतपणे होत राहणे आवश्यक असल्याने अन्न व औषध प्रशासनाकडून मेडिकल ऑक्सिजनच्या अखंडित पुरवठ्यासाठी जिल्ह्यातील मेडिकल ऑक्सिजन उत्पादक, पुरवठाधारक, जिल्हा रूग्णालय व खाजगी रूग्णालयांशी समन्वय ठेवण्यात येत असtन मेडिकल ऑक्सिजन व रेमडेसीवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत काही अडचण असल्यास सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन (म. राज्य), जालना यांचेशी 9764177758 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जालना जिल्हयात ऐसेम गॅसेस प्रा.लि. व एम. एस. ऑक्सिजन हे दोन उत्पादक तथा पुरवठादार आहेत. त्या व्यतिरिक्त राज इंन्टरप्राईजेस संभाजी नगर जालना, योगीराज ट्रेडर्स, भोकरदन नाका, जालना हे दोन पुरवठादार आहेत. तसेच जिल्ह्यात रेमेडिसीव्हर इंजेक्शन कोविड रूग्णालय संलग्न मेडीकलमध्ये उपलब्ध असून भोकरदन नाका येथील प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र येथेही उपलब्ध आहे. (coronavirus: Five-point plan ready to contain possible outbreak in jalna)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 5 April 2021 https://t.co/sRrOXb7hgs #Superfast100News | #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 5, 2021
संबंधित बातम्या:
जालन्यात दर पंधरा दिवसांनी कामगारांची कोरोना चाचणी होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
लॉकडाऊन रद्द केल्यानंतरचा जल्लोष भोवला, खासदार इम्जियाज जलिल यांच्यावर गुन्हा दाखल
जालन्यात कोरोना रोखण्यासाठी ‘अॅक्शन’ प्लान; आरोग्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना
(coronavirus: Five-point plan ready to contain possible outbreak in jalna)