अजितदादांना कोर्टाकडून मालमत्तेसंदर्भात दिलासा, गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया
आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली अजित पवार यांची मालमत्ता दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात आली आहे. यावर आता गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गुरुवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. नव्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान त्यानंतर लगेचच शुक्रवारी अजित पवार यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली. ती म्हणजे आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली अजित पवार यांची मालमत्ता दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात आली आहे. एवढंचं नाही तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित मालमत्ता देखील कोर्टाने मुक्त केली आहे. कोर्टाच्या या निर्णयावर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले सदावर्ते?
आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की प्रत्येक भारतीय नारिकाला अधिकार असतो. एखाद्या विषयाच्या चौकशीची मागणी करण्याचा. त्या अनुषंगाने किरीट सोमय्याजींनी अर्ज केला असेल. त्यावर तथ्य पडताळून पाहिल्यानंतर आपले ट्रिब्युनलचे माननीय न्यायमूर्ती भंडारी यांनी निकाल दिला. अजित पवार यांना बेनामी मालमत्तेसंदर्भात क्लीन चीट देण्यात आली. मला असं वाटतं तो न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावर चुकीच्या पद्धतीनं बोलणं किंवा राजकारण करणं मला योग्य वाटत नाही. ते राज्यघटनेला देखील अभिप्रेत नाही. संविधानिक भूमिकेच्या विरुद्ध जाऊन यामध्ये काही घडलं असं मला वाटत नाही असं यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
दरम्यान अजित पवार यांना आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेसंदर्भात दिल्लीतील कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना देखील प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी यावर बोलणं टाळलं आहे. मला त्याबाबत माहिती नाही असं त्यांनी म्हटलं आहे. विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. जर एकदा निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या तर काय अडचण आहे. आम्ही याविरोधात कोर्टात जाणार की नाही जाणार हे येत्या सोमवारी स्पष्ट होईल असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.