मालमत्ता प्रकरणात अजितदादांना कोर्टाचा दिलासा, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
अजित पवार यांची मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आली होती, ही मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात आली आहे. यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला.अजित पवार यांची मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आली होती, ही मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात आली आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयाने अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित मालमत्ता देखील कोर्टाने मुक्त केली आहे. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. ते मला माहिती नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला, तीन प्रमुख घटक पक्ष मिळून राज्यात महाविकास आघाडीच्या केवळ 50 च जागा आल्या तर दुसरीकडे महायुतीला मात्र मोठ यश मिळालं. राज्यात महायुतीच्या तब्बल 231 जागा आल्या. या निवडणूक निकालानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. जर एकदा निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या तर काय अडचण आहे. शरद पवार आणि जयंत पाटील हे मार्कडवाडीला जाणार आहेत. एखाद्या गावात एखादी अॅक्टिव्हिटी होत असेल तर सरकारला काय प्रॉब्लेम आहे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे, तसेच महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंकामध्ये असलेली अस्थिरता याचा देखील परिणाम होत आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
दरम्यान ईव्हीएमविरोधात कोर्टात जाणार का? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला. याला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, याबाबत इंडिया आघाडीची दिल्तीत चर्चा झाली. आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्थता आहे. उत्तम जानकर प्रयत्न करत आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे. आम्ही कोर्टात जाणार की नाही हे येत्या सोमवारी स्पष्ट होईल.