नवी मुंबई | 26 जानेवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथील अंतरवली सराटा गावातून मराठा आंदोलणाची हाक दिली. सुरवातीला त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष गेले नव्हते. मात्र, आंदोलनान बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि हे आंदोलन पेटले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन जाऊन पोहोचले. ठिकठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको केला. या सर्व आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मात्र, जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम राहिले. अखेर, सरकारच्या शिष्टमंडळाने त्याची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी जरांगे पाटील यांची आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे ही प्रमुख मागणी होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन दिले. त्यानुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना आदेश दिल्याचे सांगितले होते. मात्र, याच मुद्द्याला जरांगे पाटील यांनी पुन्हा हात घातला.
वाशी येथील सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी अंतरवलीसह महाराष्ट्रातील सर्व आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे अशी पुन्हा मागणी केली. गृहविभागातून याबाबत गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्याचं सरकारने सांगितलं. पण, त्यांनी पत्र दिलं नाही. गुन्हे मागे घेण्यासाठी गृहविभागाचे पत्र लागणार आहे. त्या पत्राची तयारी सरकारने करावी असे जरांगे पाटील म्हणाले.
सरकारच्या शिष्टमंडळाने आज जीआर दिला. त्यामुळे कुणीही आता आझाद मैदानावर जाऊ नका. आज इथेच थांबा. आराम करा. मी वकिलांशी चर्चा करतो, असे ते यावेळी म्हणाले. न्यायासाठी आपण इथे आलो आहोत. आपले पोरं या शहरात आली आहेत. लेकराबाळाला पाणी लागलं तर पाणी द्या. त्यांना साथ द्या. गोरगरीब मराठ्यांना डिवचलं तर महाराष्ट्रातील मराठा समाज मुंबईत येईल हे लक्षात घ्या असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर मराठ्यांनी घरात थांबू नका. झाडून पुसून मुंबईत या. करोडोने या. जे निर्णय घेतले त्याचे पत्रक काढा. डेटाही द्या. सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश काढा. उद्या दुपारी ११ ते १२ वाजेपर्यंत आम्हाला अध्यादेश द्या. नाही तर आझाद मैदानात येणार आहोत. आम्ही इथून उठणार नाही. मला डेटा पाहिजे. अध्यादेश हवा. केसेसचं पत्र हवं, मोफत शिक्षण आणि नोकरीत राखीव जागा ठेवण्याचा निर्णय पाहिजे. १५ मिनिटात अध्यादेश दिला तर आझाद मैदानात जाणारच, पण गुलाल उधळायला असेही त्यांनी स्पष्ट केले.