रायगड : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) राज्यातील पहिला बळी गेला आहे. रायगडमधील उरण शहरातील बाजारपेठेत भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असलेल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळल्याची घटना समोर आली आहे. (Cyclone Taukte in Raigad wall collapsed one woman died)
उरणमध्ये तौत्के चक्रीवादळाचा पहिला बळी
रायगडमधील उरणमध्ये तौत्के चक्रीवादळाचा पहिला बळी गेला आहे. उरण शहरातील बाजारपेठेत वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळली आहे. त्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एक भाजीविक्रेती महिला जखमी झाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
तर दुसरीकडे रायगडमध्ये खोपोलीतील काजुवाडी येथील वस्ती मध्ये दोन घरांवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. खोपोली नगरपालिका यत्रंणानी तात्काळ घटनास्थळ गाठले. त्यानंतर कटरच्या सहाय्याने झाड तोडून बाजूला करण्याचे मदत कार्य सध्या सुरु आहे.
सध्या तौत्के चक्रीवादळ हे मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे. तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने सध्या त्याचा प्रभाव सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईत सध्या वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, सिंधुदुर्ग, आंबोळगड यांसह इतर गावांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. रत्नागिरीतील 104 गावांमधील 800 ते 1 हजार घरांची पडझड झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील बहुतांश गावात वीज पुरवठा खंडित झाला आहे. रत्नागिरी, राजापुर, देवगड, मालवण, वेगुर्ले या भागातील बत्ती गुल झाली आहे. काही ठिकाणी काल दुपारपासूनच वीज पुरवठा खंडित झाला आहे. तौत्के चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत 6 हजार 540 नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. (Cyclone Taukte in Raigad wall collapsed one woman died)
संबंधित बातम्या :
Tauktae Cyclone | कुठे झाडांची पडझड, कुठे घरांचे नुकसान, महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळाचा हाहा:कार
Tauktae Cyclone PHOTO : तौत्के चक्रीवादळाचे रौद्ररुप, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस