दि. बा. पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्या, रविकांत तुपकर आक्रमक
राजू शेट्टींनीही या मेळाव्यात भ्रमणध्वनीवरून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जासई-बेलपाडा हे स्वर्गीय दि. बा. पाटलांचे मूळ गाव आहे.
नवी मुंबईः स्वर्गीय दि. बा. पाटलांचे नाव नवी मुंबईच्या विमानतळाला देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता अधिकच आक्रमक झालीय. नवी मुंबईच्या विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव दिले नाही, तर संपूर्ण राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी रायगड जिल्ह्यातील जासई-बेलपाडा येथील कार्यकर्त्या मेळाव्यात आज (18 जुलै 2021) दिला. राजू शेट्टींनीही या मेळाव्यात भ्रमणध्वनीवरून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जासई-बेलपाडा हे स्वर्गीय दि. बा. पाटलांचे मूळ गाव आहे. (D. B. Patil name to Navi Mumbai Airport, Ravikant Tupkar is aggressive)
स्वर्गीय दि. बा. पाटलांनी भूमिपुत्रांसाठी मोठी लढाई
यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, स्वर्गीय दि. बा. पाटलांनी भूमिपुत्रांसाठी मोठी लढाई लढली. त्यांनी आपले आयुष्य भूमिपुत्रांसाठी अर्पण केले. आज त्या परिसरात जो भूमिपुत्र ताठ मानेने उभा आहे. ती फक्त दि. बा. पाटलांची देण आहे. आम्ही काही कोल्हापूर, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथील विमानतळाला स्व. दि. बा. पाटलांचे नाव द्या, असे म्हणत नाही. तर नवी मुंबईच्याच का म्हणतो कारण त्या परिसरातील प्रकल्पग्रस्तांसाठी 12 % चा निर्णय दि. बा. पाटलांनी केला.
दि. बा. पाटलांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची जनभावना
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी आणि घरे वाचवली. प्रकल्पग्रस्त सन्मानाने उभा केला. तसेच प्रस्थापित भांडवलदारांच्या विरोधात मोठी लढाई उभी केली. त्यामुळे दि. बा. पाटलांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची जनभावना त्या परिसरातील नागरिकांची आहे. तर त्या जनभावनेचा आदर केंद्र आणि राज्य सरकारने केला पाहिजे. रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीने उभी आहे. जर का केंद्र आणि राज्य सरकारने दि. बा. पाटलांच्या नावाऐवजी दुसऱ्या नावाचा विचार करण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. आता स्वर्गीय दि. बा. पाटलांच्या नावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनात आक्रमकपणे उडी घेतलीय.
संबंधित बातम्या
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव द्या, प्रवीण दरेकरांकडून भाजपची भूमिका स्पष्ट
नवी मुंबई पालिकेच्या थकबाकी धारकांना नोटिसा, 21 दिवसांच्या आत कर भरा अन्यथा मालमत्ता विक्री करणार!