Abhishek Ghosalkar | मॉरिसच्या मृतदेहाचं काय होणार? दफन होणार की नाही?, स्थानिकांनी तर…?
दहिसरमधील गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिसने गोळीबार केला, त्यानंतर त्याने स्वत:वरही चार गोळ्या झाडून घेतल्या.
कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 9 फेब्रुवारी 2024 : दहिसरमधील गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिसने गोळीबार केला, त्यानंतर त्याने स्वत:वरही चार गोळ्या झाडून घेतल्या. अभिषेक घोसाळकर यांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला तर मॉरिस भाई याचाही मृत्यू झाला. गुरूवारी संध्याकाळी घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. राज्यातही याचे पडसाद उमटले असून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर निशाणा साधला.
मॉरिसचा मृतदेह चर्चमध्ये दफन करण्यास स्थानिकांचा विरोध
दरम्यान अभिषेक घोसाळकर याच्यावर गोळीबार केल्यानंतर स्वतःवरही गोळ्या झाडून घेणाऱ्या मॉरिस नरोना ऊर्फ मॉरिस भाई याचा मृत्यू झाला. मात्र त्याचा मृतदेह चर्चच्या आवारात दफन करू देण्यास स्नथानिकांनी विरोध दर्शवला आहे. लेडी ऑफ द इमॅक्युलेट कँसेप्शन चर्च चे फादर जेरी यांनीही मृतदेह दफन करण्यास विरोध केला असल्याची माहिती समोर आली आहे. मॉरिस यांचा मृतदेह सार्वजनिक असलेल्या चर्चमध्ये दफन करण्यात येईल. जवळचं सार्वजनिक चर्च हे गोराई मध्ये आहे. चर्चमध्ये मृतदेह दफन करायचा की नाही हा अंतिम निर्णय चर्चच्या फादरचा असेल. त्यामुळे आता फादरच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून ते परवानगी देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
घोसाळकर यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार
दरम्यान मॉरिस यांच्या बेछुट गोळीबारात जीव गमवावा लागलेल्या अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी घरी ठेवण्यात आले आहे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेतले. तसेच घोसाळकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही केले. या कठीण प्रसंगात पक्ष तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी कुटुंबियांना दिला. घोसाळकर यांच्यावर थोड्या वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.