दलितांचा गाव सोडण्याचा निर्णय, अमरावतीच्या पांढरी खानमपूर गावात नामफलकावरून वाद
यवतमाळच्या पांढरी खानमपुर गावात कमान उभारण्यावरुन गावातील दलित आणि सवर्णांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. गावातील दलितांवर गावकऱ्यांनी सामाजिक बहिष्कार टाकल्याने दलितांनी मुंबईला मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे.
अमरावती | 7 मार्च 2024 : अमरावती जिल्ह्यातल्या पांढरी खानमपूर गावात प्रवेशद्वाराच्या उभारणीवरुन गावकऱ्यांमध्ये वाद सुरु आहे. या प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यावरुन संघर्ष पेटला आहे. गावातील दलितांवर त्यामुळे बहिष्कार टाकण्यात आला आहे. गावातील दलित वस्तीतील तरुणांना यासंदर्भात मुंबईला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असून गाव सोडले आहे. प्रशासनाने गावात संचारबंदी लागू केली असल्याने गावात तणावपूर्ण स्थिती आहे. तरी दलितांवर बहिष्कार टाकल्याने त्यांनी गाव सोडून मुंबईचा रस्ता धरला आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमने सामने आहेत. त्यामुळे हजारोच्या संख्येने नागरिक गाव सोडून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. या संदर्भात काल सायंकाळी दर्यापूर येथे जिल्हा प्रशासनाने लेखी पत्र देऊनही गावातील दलित मुंबईला जाण्यावर ठाम असून त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गावकऱ्यांनी रात्री दर्यापूरात मुक्काम टाकला आहे. थोड्याच वेळात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे. तेथे तोडगा नाही निघाला तर दलित समाज मुंबईच्या दिशेने होणार रवाना होणार आहे.
किराणा, पिठाची गिरणीतून दलितांवर बहिष्कार
पांढरी खानमपुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार लावण्याचा ठराव 26 जानेवारीला ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आला. त्यानंतर गावातील प्रवेशद्वारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रवेशद्वार बांधण्याचे काम सुरु झाले. परंतू यास गावातील लोकांनी त्यास विरोध केला. बांधकाम सुरू होण्यापूर्वीच 31 जानेवारीलाच लोखंडी कमान उभारून फलक लावण्यात आला. गावकऱ्यांनी याला विरोध केला. तेव्हा 13 फेब्रुवारीला पोलीसांनी फलक काढण्याचा प्रयत्न केला. पण शेकडो महिला, पुरुष यांनी प्रवेशद्वारावरच आळी पाळीने ठिय्या आंदोलन सुरू केले. गावातील दलितांवर त्यामुळे गावातील इतर समाजाने बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे इतरगावातील दलित बांधव या गावातील दलित वस्तीला अन्न आणि इतर वस्तू पुरवित आहेत. गावातील दलितांना पिठाची गिरणी, किराणा सामान आणि कामावर घेण्यास बंदी घातली आहे. आज गावातील दलित बांधव मंत्रालय लॉंग मार्च काढण्यात येणार होता. परंतू जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी घातली आहे.