पाडव्याला इथं सुन्न सुतकी स्मशान शांतता, ना विजयाची गुढी, ना घरात गोडधोड, हे दुष्टचक्र कधी संपणार?
नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने फळबागांचे मोठे नुकसान झाले. केळी पाठोपाठ कलिंगड खरबूजांच्या बागा या अस्मानी संकटात उध्वस्त झाल्या आहेत.
राजीव गिरी, नांदेड : राज्यात सर्वत्र गुढीपाडव्याचा (Gudhipadwa) उत्साह सर्वत्र दिसून येतोय. पण नांदेडमध्ये मात्र अवकाळी पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या घरात सुतक असल्याप्रमाणे वातावरण आहे.अवकाळी वारा-पावसानं (Unseasonal Rain) हातातली पिकं हातची गेली. संपूर्ण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नांदेडमध्ये (Nanded) सर्वाधिक नुकसान झालंय. शेतकऱ्यांकडे सण साजरा करायला छदामही शिल्लक नाही. उभं पिक वाहून गेल्यानं भविष्यात कुट्ट अंधार दिसतोय. मग कुठला पाडवा अन् कसली गुढी?
नांदेडच्या असंख्य गावांमध्ये दारात गुढी उभारली गेली नाही, लेकरा-बाळांना नवे कपडे नाही की घरात गोडधोड नाही. नांदेडच्या बारड शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात आजचं हे चित्र मन हेलावून टाकणारं आहे. पिकांच्या भरोशावर सगळे पैसे खर्च केले. अस्मानी संकटानं होत्याचं नव्हतं केलं. आता शेतात कोणताच माल नसल्यानं उधारी उसनवारी द्यायलाही कुणीही तयार नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलय.
वादळी वाऱ्याने स्ट्रॉबेरीचा शेतात चिखल
नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडंच मोडलय. बारड इथल्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरीच्या बागेत तर अक्षरक्षः लाल चिखल झालाय. वादळी वाऱ्याने स्ट्रॉबेरीच्या वेलांचे प्रचंड असे नुकसान झाले . ठिबक सिंचनाचे पाईप तुटून गेलेत. विक्रीसाठी उत्पादित झालेल्या स्ट्रॉबेरीच्या फळाला गारांचा मार लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय. स्ट्रॉबेरीचे उत्पादन येण्यापूर्वीच अस्मानी संकटाने घात केल्याने बळीराजावर आर्थिक संकट ओढावलय.
हदगांव- हिमायतनगर तालुक्यालाही फटका
नांदेड जिल्ह्यातील हदगांव- हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने दोन्ही तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः दोन्ही तालुक्यातील गहू आणि उन्हाळी ज्वारी आडवी पडली. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारला साकडे घालत नुकसान भरपाईची मागणी केलीय.
कलिंगड/ खरबुजांचा शेतात चिखल
नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने फळबागांचे मोठे नुकसान झाले. केळी पाठोपाठ कलिंगड खरबूजांच्या बागा या अस्मानी संकटात उध्वस्त झाल्या आहेत. गारांचा मार लागल्याने कलिंगडासह खरबुजांची फळे खराब झाली. त्यामुळे या फळांना बाजारात आधीपेक्षा निम्माच भाव मिळतोय. या आर्थिक संकटाने फळबागा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून उत्पादनाचा खर्चही निघणं अवघड झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलय.
केळींच्या बागा उध्वस्त
नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळीच्या बागांच मोठं नुकसान झालंय, रब्बी हंगामातील गव्हू ज्वारी हरभरासह तब्बल पंचवीस हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालंय, नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसान हे केळी बागांचं झालंय. मुदखेड आणि अर्धापुर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना या गारपिटीचा मोठा फटका बसलाय..
पाहणीचे सोपस्कार आटोपले
नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची अनेक नेत्यांनी पाहणी केली. काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण, स्थानिक खासदार प्रताप पाटील चिखलीकर, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन डोळ्याने पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पंचनाम्याचे सोपस्कारही आता आटोपत आलेत. आज वर्षातला मोठा सण गुढीपाडवा साजरा होत असताना अन्नदाता मात्र अस्मानी संकटाने नागवला गेलाय. आता प्रत्यक्षात सरकारी मदत कधी पदरात पडणार असा सवाल शेतकऱ्यांकडून होतोय. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आजच्या दिवशी मात्र हतबल आणि बेचैन आहे. याचे राज्यकर्त्यांना काही भान आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय.