भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी लागलीय; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
"अमित शाहजी तुमच्या भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लागली ती बघा", अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली.
Dasara Melava 2024 Uddhav Thackeray speech : “अमित शाहजी तुमच्या भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लाग ली ती बघा”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली.
तुमचा भाजप सांभाळा. दहा बारा दिवसांपूर्वी मी नागपूरला गेलो होतो. मी शहरीबाबू आहे. मी शेतकऱ्यांचं कर्जमुक्त केलं. माझं कर्तव्य म्हणून केलं. दहा रुपयात पोळी भाजी दिली कर्तव्य म्हणून दिली. मी कोरोनात काम केलं. ते कर्तव्य म्हणून केलं. मी नागपूरला गेलो. लोकांनी व्यथा सांगितल्या. सोयाबीनला भाव नाही. संत्र्यावर डिंक्या रोग येतो. कापसाच्या बोंडावर गुलाबी अळी येते. ती जॅकेट घालते की नाही माहीत नाही. अमित शाहजी तुमच्या भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लागली ती बघा. आम्हाला वाईट वाटतं एकेकाळचा आमचा मित्र पोखरला जातो. त्यांना सत्ता पाहिजे. कोणी चालेल पण सत्ता पाहिजे. याला म्हणतात सत्ता जिहाद, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गायीला राज्यमातेचा दर्जा दिला. देशी प्रजाती वाचवलीच पाहिजे. पण मला प्रश्न पडला. तर गाय राज्यमाता झाली आहे. मग राज्यभाषा काय आहे. गाईचा हंबरडा राज्यभाषा आहे. मग हा हंबरडा राज्यभाषा असेल तर कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहे. तर तो हंबरडा तुमच्या कानावर का जात नाही. पहिलं आईला वाचवा, मग गायीला वाचवा. हे आमचं हिंदुत्व आहे. महागाईपासून दूर जाण्यासाठी गायीच्या पाठी लपत आहात, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
तिसऱ्यांदा सत्ता देऊन तुम्ही म्हणत असाल हिंदू खतरे में है. त्यामुळे मी म्हणेल काँग्रेसची सत्ता बरी आहे. कारण तेव्हा तुम्ही म्हणत होता इस्लाम खतरे में है, हे बांगला देशाला बोलत आहेत. बांगला देशात काय चाललंय. अहो तुमचे लोक काय करत आहे. मला गद्दारी करून खाली खेचलं हे तुम्हाला दिसलं नाही. शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला साथ दिली. आमचं सरकार खेचलं. शकूनी मामा गद्दारांना घेऊन काम करत आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
संघाला सवाल आहे. १०० वर्ष घालवली घ्या चिंतन करा. का १०० वर्ष वाया घालावली. आताची भाजप तुम्हाला मंजूर आहे का. पूर्वीचा भाजप वेगळा होता. त्यात पावित्र्य होतं. आताचा भाजप हायब्रिड झाला आहे. संकरीत गायी सारखं. परदेशी वळूंची बिजं गर्भाशयात झाला. तसा भाजप झाला. तो भाजप आमच्यावर राज्य करणार. एवढा वाईट विचार कुणी दिला नव्हता. गद्दार आणि चोरांना नेता मानून राज्य करावं लागतं यातच तुमचा पराभव आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.