छगन भुजबळ यांच्या नाराजीची 8 दिवसांनी दखल, अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय?
एकीकडे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घडत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छगन भुजबळांच्या नाराजीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar-Chhagan Bhujbal Reaction: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेतील, अशी चर्चा रंगली होती. त्यातच आता छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले. एकीकडे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घडत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छगन भुजबळांच्या नाराजीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार हे पुण्यातील सारथीच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी सारथी कार्यालयाला भेट दिली. यावेळी अजित पवारांनी सारथीचे संचालक काकडे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांना छगन भुजबळ यांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले.
छगन भुजबळ यांनी नुकतंच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. ते लवकरच दिल्लीला जाणार असल्याची चर्चाही रंगली आहे, ते नाराज आहेत, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी “आमचा तो पक्षांतर्गत प्रश्न आहे. आम्ही तो प्रश्न पक्षातंर्गत सोडवू”, अशी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. हे बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर रविवारी १५ डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत.
छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने हिवाळी अधिवेशनातून काढता पाय घेतला. त्यानंतर त्यांनी “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर छगन भुजबळांनी ओबीसी नेत्यांशी चर्चाही केली होती. या चर्चेनंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान छगन भुजबळांनी फडणवीसांना उघडपणे नाराजी बोलून दाखवली. यावर फडणवीसांनी छगन भुजबळांना वेट अँड वॉचचा सल्ला दिला. गेले ८ दिवस हा घटनाक्रम सुरु आहे. त्यानंतर आता ८ दिवसांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवारांनी यावर भाष्य केले.