दीनानाथ रुग्णालयाच्या डॉ. केळकरांनी पत्रकार परिषद गुंडाळली, प्रश्नांचा भडीमार होताच उठले अन्…
पुणे गर्भवती महिला मृत्यूप्रकरणी डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

Deenanath Mangeshkar Hospital : आमच्याकडे डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही. मात्र डॉक्टरांच्या डोक्यात काय आलं आणि त्यांनी 10 लाख रुपयांचं डिपॉझिट नमूद केलं, असं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. केळकर यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटलंय. काही दिवसांपूर्वी येथे ईश्वरी भिसे या गर्भवती महिलेच्या प्रसूतीसाठी 10 लाख रुपयांची अनामत रक्कम मागण्यात आली होती. त्यानंतर या महिलेचा दुसऱ्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे एकीकडे पत्रकार त्यांना प्रश्न विचारत असतानाच डॉ. केलकर यांनी पत्रकार परिषद गुंडाळली आहे. तुम्ही तेच तेच तेच प्रश्न विचारत आहात, असं सांगत त्यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.
…त्यासाठी अनामत रक्कम घेतली जाऊ लागली- डॉ. केळकर
दीनानाथ रुणालयात अगोदर डिपॉझिट घेत नसत. मात्र पुढे गुंतागुंतीचे आणि महागडे उपचार खूप वाढले. लोकही लांबून आमच्याकडे यायला लागले. त्यामुळे ज्या रुग्णांच्या उपचारासाठी जास्त पैसे लागणार होते, त्यासाठी अनामत रक्कम घेतली जाऊ लागली, असेही डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितले.
…पुढे काय झाले, याची कल्पना नाही
भिसे त्यांचा मला दुपारी दोन वाजेदरम्यान कॉल आला होता. तसेच मी भिसे यांना दोन ते अडीच लाख रुपये भरण्यास सांगितले होते. रुग्णालय प्रशासन माझा शब्द डावलणार नाही, असेही मी त्यांना सांगितले होते. पुढे काय झाले, याची मला कल्पना नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.
डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा
दीनानाथ रुग्णालयातील महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा वाद वाढल्यानंतर या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेले डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतही डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे आपला राजीनामा दिला आहे. तसेच त्यांच्याकडे असलेल्या रुग्णावरील उपचारात बाधा येऊ नये म्हणून आगामी दोन ते तीन दिवस ते सेवा देतील. त्यानंतर ते त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होतील, अशी माहितीही डॉ. केळकर यांनी दिली आहे.