“पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत महाविकासआघाडी बरखास्त करु म्हणाले आणि नंतर…”, शिवसेना आमदाराचा सर्वात मोठा दावा काय?
शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला. त्यांनी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील बैठकीत महाविकासआघाडीचा पाडाव आणि भाजपशी युती करण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले.

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न आता थांबला पाहिजे, असे मला ठामपणे वाटते. परंतु जे कोणी असे गैरसमज करतात, त्यांना अचूक उत्तर दिलं जाईल. मला प्रत्येक गोष्ट माहिती असते, मी त्याचा साक्षीदार आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे या संदर्भात मी बोलेन”, असे विधान शिवसेना आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले.
दीपक केसरकर यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मोठा खुलासा केला. ज्या वेळेला भाजप सेनेची युती तोडून मंत्री पद मुख्यमंत्री पद घेतले गेले, त्या वेळेला ती विचारधारा कायम राहावी अशी शिवसेनेतील सर्व नेत्यांची मागणी होती. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यांमध्ये मीटिंग घडली ती घडवण्यामध्ये माझा फार मोठा वाटा होता. त्यामध्ये सुद्धा त्यांनी कबूल केलं होतं की आपण मुंबईत गेल्याबरोबर महाविकासआघाडी बरखास्त करू आणि युतीची स्थापना महाराष्ट्रामध्ये करू. पण त्यांनी आपला शब्द पाळला नाही, असा आरोप दीपक केसरकर यांनी केला.
“एकीकडे शिंदे साहेबांची बदनामी करायची आणि दुसरीकडे…”
“एकनाथ शिंदे यांनी किमान चार-पाच वेळा आठवण करून दिली होती. त्याच्यामुळे त्यांना ज्यावेळेला आपलं अजिबात ऐकले जात नाही, हे आमदारांच्या लक्षात आलं, त्यांच्यावर अन्याय व्हायला लागला. ते जायला निघाले, त्यावेळेला मात्र एकनाथ शिंदे तुम्ही मुख्यमंत्री व्हा मी खाली उतरतो हे जे काय सांगितलं गेलं. त्यावेळेला एकनाथ शिंदेची भूमिका अतिशय स्पष्ट होती, की ही महायुती होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही मुख्यमंत्री राहिला तरी चालेल, परंतु महायुती झाली पाहिजे. आम्ही ज्या वेळेला आसाममध्ये पोचलो, त्यावेळेला सुद्धा आम्ही सांगितलेलं होतं की आता तरी महायुती झाली पाहिजे. शेवटपर्यंत त्यांनी ही भूमिका मान्य केली नाही. इथे मात्र दिल्लीला निरोप पाठवत राहिले की मला तुम्ही आपल्याबरोबर घ्या म्हणजे एकीकडे शिंदे साहेबांची बदनामी करायची ही जी काय दुहेरी भूमिका आहे हे सुद्धा लोकांच्या समोर येणे आवश्यक आहे”, असा मोठा खुलासा दीपक केसरकर यांनी केला.
शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न थांबला पाहिजे
“दर दोन दिवसानंतर माझ्या पत्रकार परिषदा होतील. सोमवारी मी पुन्हा याबाबत सर्व पत्रकारांची बोलेन. ही जी काय एक मोहीम चाललेली आहे की एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करायची ही 100 टक्के चुकीची आहे. पक्षाच्या भूमिकेबरोबर बाळासाहेबांच्या भूमिकेबरोबर ते कायम राहिलेले आहेत. त्यांनी हा लढा कायम ठेवला म्हणूनच महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना स्वीकारलं शिवसेना पक्षाला स्वीकारलं आणि 60 पेक्षा अधिक आमदार हे आमचे निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आता थांबला पाहिजे असं मला ठामपणे वाटतं. परंतु जे कोणी असे गैरसमज पसरवतात त्यांना अचूक उत्तर दिलं जाईल. तसेच प्रत्येक गोष्ट मला माहिती असते, मी त्याचा साक्षीदार आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे या संदर्भात मी बोलेन”, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.