मुंबई कुणाची ? बालेकिल्ल्यावर कुणाचं नाव ?; देवेंद्र फडणवीस यांचा दावा काय ?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ज्यांनी घाटकोपर दुर्घटनेतील आरोपीला होर्डिंग लावण्याच्या बेकायदेशीर परवानग्या दिल्या. ते आम्हाला आता संवेदनशीलता शिकवणार आहेत का? कुणाच्या आशीर्वादामुळे त्यांना परवानग्या मिळाल्या? असा सवाल करतानाच हा आरोपी ठाकरे गटाचा सदस्य असल्याचा दावाही फडणवीस यांनी केलाय.
मुंबई हा बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचा बालेकिल्ला आहे. उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला नाही. आम्ही वारंवार दाखवून दिलं आहे. 2014मध्ये आम्ही पहिल्यांदा वेगळं लढलो, आमच्या मुंबईत 15 जागा आल्या होत्या. त्यांच्या 14 आल्या. मुंबई महापालिकेत वेगळं लढलो. ते 84 आले आम्ही 82 आलो. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला नाही. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त जागा लढवून कमी जागा जिंकल्या आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वारंवार मुंबईत का यावं लागतं? हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे म्हणून मोदींना यावं लागतंय का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी मुंबई हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला नसल्याचं निक्षून सांगितलं. मुंबईने महायुतीला वारंवार साथ दिली आहे. मुंबईकरांचं मोदींवर अधिक प्रेम आहे. मागच्यावेळी मोदींच्या मुंबईत दोन सभा झाल्या होत्या. यावेळी मोदींचा एक रोड शो आणि एक सभा घेण्याचा निर्णय घेतला. मुंबईकरांच्या मनात मोदी आहे. म्हणूनच मोदी वारंवार मुंबईत येत आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ज्यांचं आकर्षण त्यांनाच…
उद्धव ठाकरे नेते आहेत तर केजरीवाल आणि शरद पवार यांना मुंबईत का बोलावलं? या देशात लोकांना मोदी हवे आहेत. मुंबईत त्यांचं आकर्षण आहे. ज्यांचं आकर्षण आहे, त्यांना बोलावलं जातं. मोदी नसतील तर आम्ही एकनाथ शिंदेंना फिरवतो. आमचे नेते शिंदे आहेत. शिंदे यांचा रोड शो आणि सभा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठ्या होत आहेत. त्यांना प्रतिसादही मोठा मिळत आहे, असा दावाही त्यांनी केला.
ते संवेदनशीलता शिकवणार?
घाटकोपरची दुर्घटना झाल्यानंतरही मोदींनी रोड शो केला. संवेदना राहिल्या नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्याकडेही फडणवीस यांचं लक्ष वेधण्यात आलं. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा त्यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांना त्यावर बोलण्याचा अधिकार आहे का? त्यांच्या काळात या व्यक्तीला इलिगल परमिशन मिळाल्या. वरून आशीर्वाद असल्याशिवाय त्याला इलिगल परमिशन मिळाल्या नाहीत. भिंडे त्यांच्या पक्षात आहे. त्यांचे फोटो आले आहेत. प्रवेश करतानाचे. त्यांचाच माणूस आहे तो. त्याला इलिगल परमीशन दिले. लोकांचा जीव गेलाय. हा सदोष मनुष्यवध आहे. ते आम्हाला संवेदना शिकवत आहेत? त्यांनी तिथे प्रचार बंद केला का? त्यांच्या सभा बंद झाल्या का? त्यांच्या सभा चालतात. शरद पवार सभा करू शकतात. अन् मोदी आले तर असंवेदनशील? हे नाटकी लोकं आहेत. खोटारडे आहेत. त्यांच्यावर बोलताना वाईट वाटतं, असा हल्लाच फडणवीस यांनी चढवला.