नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार विषयी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला अटक करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न झाले. त्यासाठी तत्कालीन मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सुपारी दिली होती. त्यातून आपल्याला अडकवण्याचे बरेच प्रयत्न झाले. पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनादेखील माहिती आहे, असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांना नेमकं कोणत्या गुन्ह्याअंतर्गत अटक करण्याचे प्रयत्न गेल्या सरकारच्या काळात झाले? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. देवेंद्र फडणवीस यांनी गुन्ह्याविषयी काही माहिती सांगितली नाही. पण आपल्याला अडचणीत आणण्यासाठी महाविकास आघाडीकडून भरपूर प्रयत्न झाल्याचा दावा फडणवीसांनी केलाय.
“महाविकास आघाडीच्या हा पूर्ण प्रयत्न होता की, कशाही प्रकारे माझ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, मला अटक झाली पाहिजे. हे शब्द योग्य आहेत की नाहीत मला माहिती नाही. पण सुपारी ही तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आली होती. त्यावेळी बरेचसे प्रयत्न त्यांच्याकडून आणि इतरांकडून करण्यात आले. पण ते यशस्वी झाले नाहीत. मला असं वाटतं या संदर्भातील काही माहिती आमच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं त्यावेळी त्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सरकार स्थापनेचं पत्र देण्यात आलं नव्हतं, अशी माहिती माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आल्याची चर्चा आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय.
“मी याची स्वत: माहिती घेतली. तुम्ही बातमी चालवल्यानंतर मी स्वत: त्या आरटीआयबद्दल माहिती घेतली. आरटीआयमधील उत्तर असं देण्यात आलं आहे की, या संदर्भातील कागदपत्र हे सुप्रीम कोर्टात केस सुरु असल्याने राज्यपालांच्या जवळ आहेत. पण ऑफिस जवळ नाहीत. याचा अर्थ कागदपत्रे नाहीत असा होत नाहीत. कागदपत्रे आहेत. पण ते राज्यपालांच्या कस्टडीत आहेत. कारण सुप्रीम कोर्टात केस चालली आहे. चुकीचा अर्थ लावण्याचं कारणच नाही. आम्हाला नीट लेखी राज्यपालांनी पत्र दिलं तेव्हाच सरकार स्थापन झालं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सहकार क्षेत्राशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत सहकार क्षेत्राची प्रगती कशी होईल, या विषयी चर्चा झाली. या बैठकीनंतर अमित शाह यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत वेगळी बैठक देखील झाली. या बैठकीनंतर शिंदे-फडणवीसांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.