सुप्रिया सुळे यांच्या बॅनरवरुन देवेंद्र फडणवीस यांची कोपरखळी, राष्ट्रवादीची परंपरा म्हणत शरद पवार यांनाही डिवचलं…
देवेंद्र फडणवीस हे सुप्रिया सुळे यांच्या भावी मुख्यमंत्री अशा आशयाच्या बॅनर बद्दल बोलत असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये अशी पद्धत आहे म्हणत शरद पवार यांना टोला लगावला आहे.
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ( NCP Futur CM ) नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर झळकल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आणि आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचे बॅनर समोर आले आहे. मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर सुप्रिया सुळे यांचा नुकताच एक बॅनर लावल्याचे समोर आले होते. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी प्रतिक्रिया देत थेट शरद पवार यांनाही डिवचलं आहे.
देवेंद्र फडणवीस हे सुप्रिया सुळे यांच्या भावी मुख्यमंत्री अशा आशयाच्या बॅनर बद्दल बोलत असतांना म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये अशी पद्धत आहे की भावी म्हणून सांगत असतात. भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री अशा अनेक गोष्टी सांगत असतात.
पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. बघा असं आहे की मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे. कधीही काहीही होऊ शकते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील असं कधी कुणाला वाटलं होतं का ? ते बनले त्यामुळे ज्याला-ज्याला भावी वाटतोय त्याला-त्याला शुभेच्छा आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत असतांना भावी पंतप्रधान म्हणून शरद पवार यांना नाव न घेता डिवचलं आहे. तर उद्धव ठाकरे यांनाही यावेळी स्पष्ट नाव घेऊन टोला लगावला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं भाष्य चर्चेचा विषय ठरत आहे.
खरं तर अनेकदा शरद पवार यांचा भावी पंतप्रधान म्हणून अनेकांनी उच्चारलेले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी ही इच्छाही बोलून दाखवली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका राजकीय वर्तुळात चर्चेचा बनली आहे.
सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री, नाद नाय करायचा अशा आशयाचा फलक लावला होता. त्यावरुन सुप्रिया सुळे यांनी याची मुंबई पोलीसांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्यामध्ये कुणाचेही नाव नसल्याने यावर सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तर यापूर्वी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याही फोटोसहित भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते हे फलक लावत आहे की अन्य कोणी हा देखील चर्चेचा विषय ठरत आहे.
तर या बॅनरबाजीवरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गटबाजी आहे का ? अशी चर्चा ही यानिमित्ताने राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. पण याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी लगावलेली कोपरखळी मात्र जोरदार चर्चेत आहे.