शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचा लूक कसा असणार? गुलाबी रंगही उठून दिसणार
Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar Look For Swearing in Ceremony : उद्या महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत. या विशेष कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा खास लूक असणार आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी उद्या पार पडणार आहे. आझाद मैदानावर या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या लूककडेही विशेष लक्ष असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे खास तुकाराम महाराज केशर पगडी तयार करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार गुलाबी फेटे देखील तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात गुलाबी रंग देखील दिसणार आहे.
खास पगडी अन् फेटे बनवले
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. आता उद्या (5 डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राज्यातील मुख्यमंत्री उद्याच्या शपथविधी उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना शिंदे गटातील नेत्यांसाठी खास तुकाराम केशर पगडी बनविण्यात आल्या आहेत.
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री!
भाजपच्या गटनेता पदावर देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. विधिमंडळात भाजपची बैठक पार पडली या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्याक आला. त्यानंतर भाजप आमदारांनी फडणवीसांच्या नावाला अनुमोदन दिलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील हे आता निश्चित झालं आहे.
देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष केला जात आहे. राज्यभरातील भाजपच्या कार्यालयांसमोर जल्लोष केला जात आहे. एकमेकांना लाडू भरवत, फटाके फोडत आनंद साजरा केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शुभेछा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. विधिमंडळ गट नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यामुळे त्यांना भेटून शुभेच्छा देणार आहेत. उदय सामंत, अर्जुन खोतकर, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, किशोर आप्पा पाटील आणि इतर नेते भेटून शुभेछा देणार आहेत.