Devendra Fadanvis : मोदींचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ… राऊतांच्या दाव्यावर काय म्हणाले फडणवीस ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राऊतांच्या या विधानावर थेट आणि स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरही मुख्यमंत्री पुन्हा बोलले. आमची भूमिका स्पष्ट आहे. ही जी काही कबर आहे, ही एएसआयची प्रोटेक्टेड आहे.

नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असं मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. त्यावरून आता राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राऊतांच्या या विधानावर थेट आणि स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. वडील जिवंत असताना मुलांचा विचार करायचा नाही, तो होत नसतो. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अजून आली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. माझा विषय आहे, मााझा त्याच्याशी संबंध नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
वडील जिवंत असेपर्यंत…
‘मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही,नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत, अजून बरीच वर्ष ते काम करणार आहेत. आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे , 2029 चे पंतप्रधान म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडेच पाहतो आहोत. पूर्ण देशही तेच बघत आहे, त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघल संस्कृती आहे, त्यामुळे आत्ता कोणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही, तसा प्रश्नही नाही. जोपर्यंत माझा विषय आहे, मााझा त्याच्याशी संबंध नाही’, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरही मुख्यमंत्री पुन्हा बोलले. आमची भूमिका स्पष्ट आहे. ही जी काही कबर आहे, ही एएसआयची प्रोटेक्टेड आहे. त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो की ना आवडो, 50-60 वर्षापूर्वी कायद्याने प्रोटेक्शन मिळालं आहे. त्यामुळे कायद्याचं पालन करणं आमची जबाबदारी आहे. पण औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही हे मात्र निश्चित, असं फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट बजावलं.
भाषेसाठी कायदा हातात घेणं चुकीचं
राज्यामध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मनसैनिकांना देण्यात आले आहेत. त्यावर फडणवीसांनी भूमिका मांडली. मला वाटतं ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी ती वापरली पाहिजे हा आग्रह असणं हे चुकीचं नाही. पण त्यासाठी कायदा हातात घेणं हे चुकीचं होईल. कोणी कायदा हातात घेणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिक्षणाचं भारतीयकरण होत आहे. इंग्रजांनी शिक्षणाचं मॅकोलेकरण केलं. आम्ही आपल्या देशाला गुलाम बनवण्याचं मॅकोलेचं पत्र आहे. जोपर्यंत या ठिकाणच्या शिक्षणपद्धती बदलणार नाही, तोपर्यंत भारतावर राज्य करणार नाही, असं त्याने पत्रात म्हटलं. याचा अर्थ जी शिक्षणपद्धती भारतात आली होती, ती भारतीयांना गुलाम बनवण्यासाठी आली होती. त्यात बदल करून त्याचं भारतीयकरण होणार असेल तर त्याचं कुणाला दु:खं होण्याचं कारण नाही. कोणीही राष्ट्रभक्त व्यक्ती म्हणेल याचं भारतीयकरण झालं पाहिजे. सोनिया गांधींनी त्याची माहिती घ्यावी आणि भारतीयकरणाला संरक्षण दिलं पाहिजे.
राज्यातील नद्या निर्मळ झाल्या पाहिजेत
राज्यातील नद्या या निर्मळ झाल्या पाहिजे. आमचाही प्रयत्न आहे. त्यासाठी मिशन हाती घेतलं आहे. हे काम लगेच होणारं नाही. प्रत्येक महापालिका, नगर पालिका आणि नगरपंचायत यांचं एफ्युलंट तयार करावं लागतं. नाल्याचं पाणी ट्रॅप करून ट्रीट करावं लागतं. हा वेळ खाणारा आणि खर्चिक कार्यक्रम आहे. याची सुरुवात आम्ही केला आहे. जेव्हा कुंभमेळा होईल. तेव्हा पवित्र गोदावरीत लोकं स्नानासाठी येतील तेव्हा त्यांना स्वच्छ पाहण्याचा अनुभव देता येणार आहे.