आता भाजपमध्ये व्हॅकेन्सी नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या महाजनादेश यात्रेला (BJP Mahajanadesh Yatra) सुरुवात झाली.
अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या महाजनादेश यात्रेला (BJP Mahajanadesh Yatra) सुरुवात झाली. अमरावतीतील मोझरी इथं या यात्रेतील पहिली जाहीर सभा झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षातील कार्याचा आढावा मांडला. राज्याच्या विकासासोबतच विदर्भाच्या वाटणीचं विदर्भाला दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड दिली, ते आता भाजपमध्ये येत आहेत. मात्र आता भाजपमध्ये व्हॅकेन्सी नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच विरोधकांना खुलं आव्हान दिलं. “महाराष्ट्रातील गावागावात जाऊन सेवा करण्यासाठी या यात्रेची सुरुवात आम्ही करत आहोत. देशात मोदींच्या नेतृत्वात गाव, गरिब आणि किसान ही त्रिसूत्री घेऊन काम केले. विरोधकांना आव्हान आहे की तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं ते सांगा. आम्ही कमी पडलो असेल, तर महाजनादेश यात्रेला निघणार नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“माझ्या जीवनात प्रत्येक नव्या घटनेच्या वेळी राजनाथ सिंह असतात. महाजनादेश यात्रेला आशीर्वाद द्यायला आलेल्या सर्वांना शतश: प्रणाम. महाराष्ट्राच्या जनतेचा आदेश आम्हाला प्राप्त झाला. जनता हीच आमची राजा, जनता आमचे दैवत. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. महाराष्ट्राचा जनादेश घ्यायला निघालो आहे”, असं नमूद केलं.
विदर्भ सुजलाम सुफलाम
“गेल्या पाच वर्षात दीड लाख शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन दिलं. 20 हजार कोटींची सिंचनाची कामे केली. विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांनी निधी दिला त्यांचे आभार. विदर्भ सुजलाम सुफलाम झाला. मोठया प्रमाणात विदर्भात औद्यीगिक गुंतवणूक झाली. इतके वर्ष विदर्भाचे ओरबाडून नेलं, मात्र आता विदर्भाला पैसे मिळाले. आता महामार्ग उभा राहतोय”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे
- महाराष्ट्रात मुख्यमंत्री सडक योजनेतून 30 हजार किलो मीटरचे रस्ते तयार केले. 18 हजार गावात पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या. हे सर्व विक्रम आहेत.
- प्रत्येक गाव, शहर हागणदारी मुक्त करण्याचे काम केलं. महामार्ग आणि रस्त्यांचे जाळे महाराष्ट्रात विणले. शिक्षण योजनांमध्ये सुधार केला.
- देशात सर्वाधिक रोजगार महाराष्ट्राने उभा केला.
- आमच्या सरकारने बचतगटाने 40 लाख कुटुंब म्हणजे 2 कोटी लोक जोडले.
- एकही क्षेत्र नाही ज्यात या सरकारने काम केलं नाही.
- पूर्वी मुख्यमंत्री दिल्लीला जायचे तेव्हा हात हलवत यायचे, पण मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिले.
- हे सरकार गरीबांना आजारात उपचारासाठी मदत करते.
- पाच वर्षात परिवर्तन पाहिलं, एकीकडे आमचे सरकार जे तुमच्यासाठी काम करते. एक सरकार होते जे पंधरा वर्ष स्वतःच्या स्वार्थाचा विचार करीत होते. एकीकडे 15 वर्षे यांचे हे कोडगे लोक. त्यांना लोकसभा निवडणुकीत धोबीपाचाड दिली.
- हे लोक आमच्याकडे येत आहेत, आता भाजपमध्ये व्हॅकेन्सी नाही.
- महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही.
- महाराष्ट दुष्काळमुक्त करेन.
- महाराष्ट्र यापुढे एखाद्या प्रगत राष्ट्राशी स्पर्धा करेल.