…अन् फडणवीसांनी ‘या’ खास कारणासाठी मानले एकनाथ शिंदेंचे आभार, महायुतीच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपालांकडे सत्तास्थपानेचा दावा केला, या दाव्यानंतर महायुतीमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली.
राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान त्यापूर्वी आज महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर महायुतीची एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंद, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
महायुतीकडून राज्यपालांना पत्र दिले आहे, नवीन सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला आहे. राज्यपालांनी आम्हाला 5 तारीख 5 वाजताचा वेळ शपथविधीसाठी दिला आहे. राज्यपालांना महायुतीतल्या घटक पक्षांच्या सहीचे पत्र दिले आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या समर्थनार्थ पत्र दिले आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, अजितदादानी देखील त्यांच्या आमदारांच्या पाठिंब्यांचे पत्र दिले आहे. मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित असणार आहेत. किती लोकांचा शपथविधी होणार याची माहिती आज संध्याकाळपर्यंत दिली जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपद आमच्यासाठी तांत्रिक बाब आहे, आतापर्यंत आम्ही तिन्ही मिळून निर्णय घेत आलो आहोत. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात रहावं अशी मी त्यांना विनंती केली आहे. त्याल ते सकारात्मक प्रतिसाद देतील असं मला वाटतं. आम्ही जी आश्वासन दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करू. बैठकीमध्ये इतर मंत्र्यांबाबत निर्णय घेऊ असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.