सोलापूर: राज्यसभा निवडणुकीला (rajyasabha election) फक्त आठ दिवस उरले आहेत. त्यामुळे सहाव्या उमेदवाराच्या विजयासाठी शिवसेनेसह भाजपने (bjp) जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही पक्षांचा भर अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्यावर आहेत. त्यासाठी जोरबैठका आणि फोनाफोनीही सुरू आहे. या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) शनिवार 4 जून रोजी सोलापूरला जाणार आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व आलं आहे. या दौऱ्यात फडणवीस सोलापुरातील दोन अपक्ष आमदारांना भेटणार असल्याची चर्चा आहे. त्यापैकी एक आमदार भाजप पुरस्कृत आहे. तर दुसरा आमदारा हा राष्ट्रवादीच्या जवळचा आहे. या आमदाराला आपल्याकडे वळवण्यासाठी स्वत: फडणवीस मैदानात उतरले आहेत. त्यामुळे अपक्ष आमदार कुणाच्या गळाला लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष मतांची जुळवाजुळव सुरु असून सोलापूर जिल्ह्यात दोन अपक्ष आमदारांमुळे फडणवीसांच्या दौऱ्याचे महत्त्व वाढले आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे दोघेही अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यापैकी राजेंद्र राऊत हे भाजप पुरस्कृत असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केलंय. तर करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे राष्ट्रवादीशी जवळीक असलेले आमदार आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसोबतच देवेंद्र फडणवीसांशीही त्यांची जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच मोठे बंधू आणि राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यावरील ED नोटीसीमुळे आमदार संजय शिंदे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
दरम्यान, भाजपचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला होता. अपक्ष आमदार आम्हाला सद्सद्विवेक बुद्धीतून मतदान करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे हे अपक्ष आमदार खरोखरच भाजपला मतदान करणार की अपक्ष आमदारांना आपल्याकडे कायम ठेवण्यात शिवसेना यशस्वी ठरते हे येत्या 10 जून रोजीच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, अपक्ष आमदारांनी सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यापैकी काही अपक्ष आमदारांचा राष्ट्रवादीला तर काहींचा शिवसेनेला पाठिंबा आहे. मात्र, या आमदारांनी सत्तास्थापनेसाठी आघाडीला पाठिंबा दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत आघाडीसोबत या आमदारांची चर्चा झाली नसल्याचं वृत्त आहे. त्यामुळे या आमदारांना आघाडीचा व्हीप लागू होण्याची शक्यता कमी असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपकडे सध्या 31 मते आहेत. विजयासाठी 42 मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने ही संख्या 41वर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला विजयासाठी दहा मतांची गरज आहे. आपल्याला दहा आमदारांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास भाजप नेते व्यक्त करत आहेत. तर अपक्ष आमदारांशी आमचे पक्षश्रेष्ठी चर्चा करत असल्याचं खुद्द धनंजय महाडिक यांनी सांगितलं आहे. त्यामुळे अपक्ष कुणाचे? हाच प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे.