वाल्मिकी कराडच्या शरणागतीनंतर फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
वाल्मिकी कराड याने अखेर आज सीआयडीसमोर शरणागती पत्कारली, त्याच्या शरणागतीनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहकरण करून त्यांची हत्या करण्यात आली, यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून वाल्मिकी कराडवर देखील आरोप करण्यात येत आहेत. अखेर घटनेच्या 22 व्या दिवशी वाल्मिकी कराड याने शरणागती पत्कारली आहे. तो पुण्यात सीआयडीला शरण आला, वाल्मिकी कराडच्या शरणागतीनंतर राजकीय वर्तुळात आता आरोप-प्रत्यारोपाला उधाण आलं आहे. दरम्यान वाल्मिकी कराडच्या शरणागतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जे या प्रकरणात दोषी असतील त्या कोणालाच आम्ही सोडणार नाही असा इशारा यावेळी फडणवीस यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी माझं फोनवर बोलणं झालं आहे. या घटनेत जे दोषी असतील त्या कोणालाच सोडणार नाही. प्रत्येक दोषींवर कारवाई करणार. जाणीवपूर्वक हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. ज्यांचा -ज्यांचा या घटनेत सहभाग आहे, त्या प्रत्येकावर कारवाई होणार. आम्ही कोणालाही सोडणार नाही, मात्र ज्यांना यामध्ये राजकारण महत्त्वाचं वाटत त्यांना ते लखलाभ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान वाल्मिकी कराडच्या शरणागतीनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. वाल्मिकी कराडवर मोक्का अंतर्गंत कारवाई करावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. जोपर्यंत वाल्मिकी कराडवर मोक्का लावण्यात येत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तसेच जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. धनंजय मुंडेंकडे बीडचं पालकमंत्री पद देऊ नये, कोणालाही द्या पण जर या प्रकरणात देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर मुंडेंना पालकमंत्रिपद देऊ नका अशी मागणी संभाजीराचे छत्रपती यांनी केली आहे. दरम्यान वाल्मिकी कराड हा सीआयडीला शरण आल्यानंतर आता त्याला मेडिकल चेकअपसाठी नेण्यात आलं आहे.