Dhananjay Munde : फक्त पूरग्रस्तांना मदत केली, गोगलगाईने पिकं खाल्ली त्यांचं काय? त्यांनाही मदत करा, धनंजय मुंडेंची फडणवीसांकडे मागणी
माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गोगलगाईने ज्या शेतकऱ्यांची पिकं खराब केली आहेत. त्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी फडणवीसांकडे केली.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातला बळीराजा संकटात (Farmers) सापडलेला आहे. आधी उन्हाळ्याच्या झाडा आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी (Flood) शेतकऱ्यांनी पेरलेली पिकं माती मोल केलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत असतानाच काल शासनाकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आणि पावसामुळे ज्यांची पिकं गेली आहेत त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 13600 प्रमाणे मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली. मात्र शेतकऱ्यापुढे फक्त पावसाचं संकट नाहीये आता दुसरं एक मोठा संकट शेतकऱ्याची पिकं आणि त्याचा खिसा दोन्हीही पोखरतंय. त्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गोगलगाईने ज्या शेतकऱ्यांची पिकं खराब केली आहेत. त्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी फडणवीसांकडे केली.
शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी
याबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, गोगलगाईमुळे 10 हजार हेक्टर जमितील पीक खराब झालं. काल जो निर्णय घेतला त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत होणार नाही. गोगलगाईने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. याचे आतापर्यंत पंचनामे देखील झालेले नाहीत. आपण तात्काळ पंचनामे करावेत असे मी उपमुख्यमंत्री यांना सांगितले. यात सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचे झालंय, असेही ते म्हणाले.
जनतेला कळेना सरकार आहे की नाही
आधी दोन व्यक्ती सरकार चालवत होते, आता खातेवाटप देखील झालेले नाही. जेव्हा लोकांच्या अडचणी संपतील तेव्हा राज्यात सरकार आले असे लोकांना वाटेल, आताही दोनच लोक सरकार चालवत आहेत, यामुळ आजून सरकार आहे की नाही हे 12 कोटी जनतेला कळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
शेतकऱ्यांची मदतीसाठी आंदोलनं
काल लातूर जिल्ह्यातल्या मसलगा इथं अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लातूर ते जाहिराबाद महामार्गाचे मसलगा येथील काम त्वरित पूर्ण करा, अतिवृष्टी आणि गोगलगाई किडीच्या अतिक्रमनात पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी या रास्ता रोकोदरम्यान मागणी करण्यात आली आहे.
बळीराजाची चिंता संपेना
संकटं ही बळीराजाच्या पाचवीलाच पुजलेली असतात. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी नापीकी, तर कधी कीड, त्यामुळे राज्यातला शेतकरी बेजार झालाय. त्यातच गेल्याा दोन अडीच वर्षात कोरोनामुळे लागलेल्या निर्बंधाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. त्यामुळे आता तरी किमान शेतकऱ्यांना सर्वसमावेशक आणि भरखोस मदतीची अपेक्षा आहे.