धनंजय मुंडे यांचा महासंकल्प, देशात 11 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी ‘नमामि वैद्यनाथम्’ नेणार, पळवलेला दर्जा परत आणणार…
गुढीपाडव्यानिमित्त परळीत आगळ्या वेगळ्या नमामि वैद्यनाथम् कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी धनंजय मुंडे यांनी केलेला महासंकल्प सध्या जोरदार चर्चेत आहे.
संभाजी मुंडे, परळी (बीड): गुढीपाडव्याच्या निमित्ताने परळीत (Parali) आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मोठा संकल्प केला आहे. परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग झारखंडला पळवल्याचा जो अक्षम्य प्रकार घडलाय, तो कदापि सहन करणार नाही, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे. येत्या काही दिवसात देशातील उर्वरीत ११ ज्योतिर्लिगांच्या ठिकाणी नमामि वैद्यनाथम हा कार्यक्रम घेऊन परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिगांचं महत्त्व पटवून सांगणार असल्याचं सूतोवाच धनंजय मुंडे यांनी केलं. गुढीपाडव्यानिमित्त काल नाथ प्रतिष्ठानच्या वतीने परळीत नमामि वैद्यनाथम् या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
काय आहे नेमकं प्रकरण?
देशभरात १२ ज्योतिर्लिंगांमध्ये परळी येथील वैद्यनाथ मंदिराचा समावेश आहे. मात्र केंद्र सरकारच्या गॅझेटमध्ये झारखंड येथील वैद्यनाथ मंदिराला ज्योतिर्लिंगाचा दर्जा देण्यात आलाय. त्यानुसार झारखंड सरकारला विकासनिधीही मंजूर करण्यात आलाय. मात्र परळीच्या ज्योतिर्लिंगाचं नाव यातून वगळण्यात आलंय. पुरातनकाळापासून ख्यात असलेल्या परळी वैद्यनाथाचा ज्योतिर्लिंगाचा दर्जा पुन्हा मिळवून देणारच, असा संकल्प धनंजय मुंडे यांनी केलाय.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
परळीत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ ज्यांनी कुणी स्थान पळवलं असेल त्याला धाम आणि ज्योतिर्लिंगाचा फरक लक्षात आला नसेल. म्हणून या भागाचा एक लोकप्रतिनिधी, कुटुंबातला एक सदस्य आणि प्रभू वैद्यनाथाचा खरा भक्त या नात्यानं द्वादशपंचम ज्योतिर्लिंगाचं स्थान परळी हेच आहे, हे पटवून देण्याचं आव्हान मी स्वीकारलंय. म्हणून मराठी नववर्षाच्या सुरुवातीला गुढी पाडव्याला नमामि वैद्यनाथम् या कार्यक्रमाची सुरुवात केली. आज आलेल्या सर्व कलाकारांना विनंती करणार आहे, आज जरी हा कार्यक्रम पाडव्यानिमित्त होत असला तरी दरवर्षी प्रत्येक शिवरात्रीच्या निमित्तानं नाथ प्रतिष्ठानच्या वतीने परळीत होणार आहे.
देशभरात महत्त्व सांगणार
तसेच नमामि वैद्यनाथम् हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात नेणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. उर्वरीत ११ ज्योतिर्लिंगाची स्थानं तसेच झारखंडमध्येही हा कार्यक्रम करून परळी वैद्यनाथाचं महत्त्व पटवून सांगणार असल्याचा संकल्प धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवला. वाराणसी आणि काशी पेक्षा परळीच्या प्रभू वैद्यनाथाचे महत्त्व काकणभर जास्त आहे. मात्र काही लोकांना धाम आणि ज्योतिर्लिंग यातील फरक कळला नाही. त्यामूळे झारखंड येथील बैद्यनाथ धामला केन्द्र सरकारच्या गॅझेट मध्ये समावेश केला. आमचे प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग पळून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मी प्रभू वैद्यनाथ भक्त या नात्याने ते परत मिळवल्य शिवाय राहणार नाही.. आणि ते परत आणण्याची ताकत माझ्यात आहे. असं म्हणत धनंजय मुंडे यांनी मुंडे बहिणींवर निशाणा साधला.
नमामि वैद्यनाथम् कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान मार्फत “नवामि वैद्यनाथम्” या खास संगीतमय शिवपूजनाचं आयोजन करण्यात आलं. ‘हर हर शंभू’ या लोकप्रिय गीताच्या गायिका अभिलिप्सा पांडा, गायिका बेला शेंडे, अर्या आंबेकर, गायक आणि संगीतकार स्वप्नील गोडबोले आणि इंडियन आयडल फेम प्रतीक सोळशे या कलाकारांनी परळीकरांसाठी खास संगीताची मेजवानी सादर केली. दरम्यान स्वतः धनंजय मुंडे यांनी प्रेक्षकात बसून या कार्यक्रमाचा आनंद घेतला.