‘त्यांची राजकीय कारकीर्द विश्वासघाताची; त्यांच्या सांगण्यावरून..’, धनंजय मुंडेंचं शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य
धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते अकोले येथे प्रचारसभेत बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता शेवटचे अवघे काही तास शिल्लक आहेत. वीस नोव्हेंबरला म्हणजे बुधवारी मतदान होणार आहे. तर तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी आहे. दरम्यान प्रचाराला आता कमी वेळ राहिला आहे, प्रचार सभांना वेग आला असून, विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. या निवडणुकीकडे राज्यासोबतच संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कारण दोन मोठ्या पक्षात पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडणूक होत असल्यानं आता मतदारराजा कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार याबाबत उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांचं नाव न घेता गद्दार या शब्दावरून धनंजय मुंडे यांनी जोरदार निशाणा साधला. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोलेमध्ये आयोजित प्रचार सभेत बोलत होते. तुतारीच्या आदर्श नेतृत्वाने शाहू कोण आणि गद्दार कोण हे आम्हाला सांगावे? 78 पासून त्यांची राजकीय कारकीर्द विश्वासघाताची आणि गद्दारीची राहिली आहे. पण त्यांनी केलं तर गद्दारी नाही, असा घणाघात मुंडे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
तुतारीच्या आदर्श नेतृत्वाने शाहू कोण आणि गद्दार कोण हे आम्हाला सांगावे? 78 पासून त्यांची राजकीय कारकीर्द विश्वासघाताची आणि गद्दारीची राहिली आहे. पण त्यांनी केलं तर गद्दारी नाही? पण त्यांच्याच सांगण्यावरून दादा आणि आम्ही केलं तर आम्ही गद्दार. अजितदादा आणि आम्ही कुणासोबत गद्दारी केली नाही. आमचं इमान मायबाप जनतेशी आहे. जनतेला विकासाचे जे स्वप्न दाखवले ते पूर्ण करण्यासाठी सत्तेत सहभागी झालो. 2019 ला भाजप – शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाले होते. पण काय खेळ झाला बघा. भाजपपासून कुणाला फोडलं? त्याला काय म्हणतात शाहू? त्याला गद्दारी म्हणत नाही ओ. गद्दार कोण? तर आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते. ते मोठे, त्यांनी काहीही केले तर जमतं असा घणाघात धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, समोरा समोर बसायचे असेल तर धनंजय मुंडेंची तयारी आहे. 2017 पासून दिल्लीत काय झालं ते दादांचा शपथविधी ते महाविकास आघाडीचे सरकार येण्यापर्यंत काय झालं हे पुराव्यानिशी सिद्ध करेल. आम्हाला गद्दार म्हणू नका. 78 पासून महाराष्ट्राच्या जनतेसोबत गद्दारी कुणी केली? हे सर्वांना माहिती आहे. आम्ही पुरोगामी विचारांशी कुठलीही तडजोड न करता महायुती सहभागी झालो, ते फक्त विकासासाठी असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.