पंकजा मुंडे यांची एज्युकेशन सोसायटी, ‘आश्रयदाता’ सभासद धनंजय मुंडे? भावा-बहिणीत नेमकं चाललंय काय?
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात नेमकं चाललंय का? एकत्र यायचंय की राजकीय दुरावा दाखवायचाय? चार दिवसांतील घटनाक्रमाने जनतेत तुफान चर्चा
महेंद्रकुमार मुधोळकर/संभाजी मुंडे, परळी: कौटुंबिक स्तरावर भाऊ-बहीण आणि राजकीय क्षेत्रात कट्टर वैरी. पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) . भावा-बहिणीच्या या संबंधांत नेमकी जवळीकता येतेय की दुरावा? की राजकीय दुरावा ठेवण्यासाठी आग्रह धरला जातोय? यावरून बीड आणि मराठवाड्यातील जनतेत संभ्रम निर्माण झालाय. मागील चार दिवसात घडलेल्या वेगवान घडामोडींवरून भावा-बहिणीत नेमकं काय चाललंय, यावरून प्रश्न विचारले जात आहेत. नुकतीच समोर आलेली माहिती म्हणजे, पंकजा मुंडे यांच्या परळी येथील जव्हार एज्युकेशन सोसायटीतील आश्रयदाता सभासद पदी धनंजय मुंडे यांनी बिनविरोध निवड झाली आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासूनची ही सोसायटी आहे. मात्र आज पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय शत्रुत्व असूनही या सोसायटीवर धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड कशी झाली, यावरून आश्चर्य व्यक्त होत आहे..
काय आहे नेमकं प्रकरण?
परळी येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीवर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची एक हाती सत्ता होती. त्यांच्या नंतर मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे यांनी जवाहर एज्युकेशन सोसायटीवर वर्चस्व निर्माण केले. मात्र या वरून बहीण पंकजा आणि भाऊ धनंजय मुंडे यांच्यात नेहमीच वादंग पाहायला मिळाला. जवाहर एज्युकेशन सोसायटीत झालेल्या अनियमिततेवरून धनंजय मुंडे हे न्यायालयात देखील गेले होते.
12 वर्षानंतर संस्थेसाठी निवडणूक होणार आहे. एकूण 34 जागांसाठी निवडणूक होणार असून त्यातील एक जागेसाठी आश्रयदाता सभासद गटातून धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने धनंजय मुंडेंची बिनविरोध निवड झाली आहे. आश्रयदाता सभासद म्हणून धनंजय मुंडे यांची निवड होणं आणि त्यांच्याविरोधात एकही सभासद उभा न राहणं, यावरून प्रश्नचिन्ह उभं केलं जातंय. या सोसायटीसाठी ६ मे रोजी निवडणूक होणार आहे. तर ७ मे रोजी सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
भाऊ-बहीण एकत्र की पुन्हा दूर-दूर?
तीन दिवसांपूर्वीच नगर जिल्ह्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी नारळी सप्ताहानिमित्त पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले. गडाचे महंत नामदेव शास्त्री हेदेखील इथे उपस्थित होते.
समाजासाठी आपण राजकीय वैर विसरून एकत्र येऊ, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं. तर गडाबद्दल मी काही वाईट बोलले तर माझी मान कापून ठेवीन, असा शब्द पंकजा मुंडे यांनी दिला.
त्यानंतर पुढच्या एका बीडमधील मनूर येथील कार्यक्रमातही भाऊ-बहीण एकत्र आले खरे. मात्र इकडे कार्यक्रम सुरु असताना तिकडे पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची धाड पडली. वरिष्ठांकडूनच तसे आदेश आल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या व अशा कारवाईवरून आश्चर्यदेखील व्यक्त केलं.
तर त्याच कार्यक्रमातून धनंजय मुंडे यांनी घाई-घाईने एक्झिट घेतली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या एकत्र येण्यातूनच हा प्रकार घडला असावा, यातून वरिष्ठांना काही संदेश द्यायचा आहे का, असे संकेत मिळाले.
सहकार मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा आज-उद्या मुंबईत येत आहेत. मात्र त्यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेणंही टाळलं. तर आता पुन्हा एकदा जव्हार एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत काय सुरु आहे, याची आतील बातमी समोर आली. त्यामुळे मुंडे भाऊ-बहीण नेमके एकत्र की दूर..दूर.. असा प्रश्न कायम आहे.