‘रॉयल एनफिल्ड’पेक्षा महागडी म्हैस; गीर जाफर जातीच्या म्हशीची किंमत अडीच लाखांहून जास्त, पाहण्यासाठी उसळली एकच गर्दी
Gir Jaffar Buffalo Coast above 2.5 lakhs : उमदा घोडा, दुभती गाय-म्हैस यांना सोन्यासारखी किंमत आहे. त्यांच्या किंमती चक्रावून टाकतात. पण शौकीन आणि दर्दी खरेदीदारांना त्याची पर्वा नसते. या मुक्या प्राण्यांसाठी ते वाजवी नाही तर वाट्टेल ती किंमत मोजतात.

जितेंद्र भैसणे, प्रतिनिधी, धुळे : गुराढोरांच्या बाजारात, पशु बाजारात चांगल्या, उत्तम दर्जाच्या, नस्ल असलेल्या प्राण्यांसाठी पशूप्रेमी कितीही पैसा खर्च करतात. उमदा घोडा, दुभती गाय-म्हैस यांना सोन्यासारखी किंमत आहे. त्यांच्या किंमती चक्रावून टाकतात. पण शौकीन आणि दर्दी खरेदीदारांना त्याची पर्वा नसते. या मुक्या प्राण्यांसाठी ते वाजवी नाही तर वाट्टेल ती किंमत मोजतात.
म्हशीला अडीच लाखांपेक्षा अधिकचा भाव
गुजरात राज्यातील जुनागढ येथील एक म्हैस अशीच चर्चेचा विषय ठरली आहे. शिरपूर कृषी बाजार समितीत गीर जाफर जातीची म्हैस तब्बल 2 लाख 60 हजार रुपयांना विक्री झाली. त्याची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. ही म्हैस दिवसाला 24 ते 25 लिटर दूध देते. आतापर्यंत शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सगळ्यात महाग म्हैस विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे संचालकांनी दिली आहे.




खंडेराव महाराज यात्रेत म्हशीची चर्चा
शिरपूर खंडेराव महाराज यात्रा निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुराचा मोठा बाजार भरत असतो. या पंधरा दिवसांच्या यात्रा निमित्त लाखो रुपयांची उलाढाल होते. आज शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गीर जाफर जातीची म्हैस व्यापारी अरुण बडगुजर यांनी जुनागड येथून विक्रीसाठी आणली होती. ती म्हैस शेतकरी धनराज साळुंके यांनी तब्बल 2 लाख 60 हजार रुपये किंमतीला विकत घेतली आहे. गीर जाफर जातीची म्हैस बघण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
71 व्या म्हशीसाठी मोजली मोठी रक्कम
धनराज सोळुंके यांच्याकडे यापूर्वीच 70 म्हैशी आहेत. परंतु त्यांना गीर जाफर जातीची म्हशीचा लळा लागला आहे. आवड असल्याने त्यांनी आज व्यापाऱ्याकडून ही म्हैस विकत घेतली. ही म्हैश दिवसाला 25 लिटर दूध देते. ही गीर जाफर जातीची म्हैस 15 ते 16 महिने दूध देत असते अशी माहिती यावेळी शेतकरी आणि व्यापाऱ्याने दिली.
देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतीसोबतच पशुपालनाचाही खूप महत्त्वाचा वाटा आहे. गावागावात मोठ्या प्रमाणात शेतकरी गाय, म्हशी, शेळीपालनातून भरीव उत्पन्न मिळवत आहेत. गुजरातमध्ये आढळणारी जाफ्राबादी जातीच्या म्हशी त्यांची ताकद आणि दूध देण्याची क्षमता जास्त असल्यामुळे ही म्हैस शेतकर्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. खंडेराव यात्रेनिमित्त ग्रामीण आणि राज्यातील विविध भागातून लहान -मोठे अनेक व्यापारी त्यांची जनावरे विक्रीसाठी आणत असल्याची माहिती शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मिलिंद पाटील यांनी दिली.