Dhule Accident : भरधाव कंटनेर हॉटेलमध्ये घुसला, 12 जण जागीच ठार, घटना सीसीटीव्हीत कैद
समृद्धी महामार्गावरील अपघाताची घटना ताजी असतानाच धुळ्यात अपघाताची घटना उघडकीस आली आहे. धुळ्यातील भीषण अपघातात 12 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे.
धुळे : बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील अपघाताची घटना ताजी असतानाच आता धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 28 जण जखमी झाले आहेत. अपघाताची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने ही अपघाताची घटना घडली. यावेळी कंटेनरने दोन वाहनांना देखील उडवले. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक
अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या गावातील लोक घटनास्थळी जमा झाले. यानंतर अग्नीशमन दल आणि पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले. या अपघातात 28 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरुन बांधकाम साहित्य घेऊन जाणारा भरधाव कंटेनर चालला होता. धुळ्यातील पळासनेरजवळ ब्रेक फेल झाला. यानंतर कंटेनर अनियंत्रित झाला आणि रस्त्यावर उभ्या वाहनांना उडवत हॉटेलमध्ये घुसला. अचानक घडलेल्या या घटनेने महामार्गावर एकच हाहाःकार उडाला. अपघाताची घटना घडताच स्थानिक लोक मदतीला धावून आले आणि लोकांना बाहेर काढण्यास सुरवात केली. सर्व मतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. मयतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.