दीक्षाभूमी स्तुपाला धोका? आंदोलन पेटले, नितीन राऊत, प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंग करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठीचं काम सुरू आहे. त्याला आंबेडकरी जनतेने जोरदार विरोध केला आहे. आज हजारो लोकांनी दीक्षाभूमी परिसरात जमून या कामाला विरोध करत तोडफोड केली. हे काम तात्काळ थांबवण्याची आंदोलकांची मागणी आहे.
नागपूरच्या दीक्षाभूमी स्तुपाच्या परिसरात भूमिगत पार्किंग करण्यात येत आहे. त्यामुळे दीक्षाभूमी स्तुपाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे, असा दावा आंबेडकरी जनतेने केला आहे. त्यामुळेच आज हजारो आंबेडकरी जनता आणि नागपूरकर रस्त्यावर उतरले असून त्यांनी या पार्किंगच्या कामाची तोडफोड सुरू केली आहे. दीक्षाभूमी परिसरात कोणत्याही प्रकारची पार्किंग खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच या आंदोलकांनी दिला आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेस नेते नितीन राऊत आणि रिपाइं नेते सचिन खरात यांनी दीक्षाभूमी स्तुपाला धोका पोहोचण्याची चिंता व्यक्त करत सरकार विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते, माजी मंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत हा मुद्दा लावून धरला. लाखोंच्या संख्येने लोक दीक्षाभूमीवर येतात. जगभरातून लोक या ठिकाणी येतात. तीन किलोमीटरच्या परिसरात 10 लाखांच्यावर लोक येत असतात. तिथे आता अंडरग्राऊंड पार्किंग केली जात आहे. त्याला आंबेडकरी जनतेने विरोध केला असून त्या ठिकाणी मोर्चा काढला आहे. आंदोलकांनी तोडफोड सुरू केली आहे. त्यामुळे मी या घटनेकडे सरकारचं लक्ष वेधत आहे. हा लोकांच्या भावनेचा विषय आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी लोकांना विश्वासात घ्यायला हवं होतं. त्यांच्याकडून सूचना घ्यायला हव्या होत्या. त्यानंतर बांधकाम करायला जायला पाहिजे होतं, असं नितीन राऊत म्हणाले.
स्तूप पडू शकतो
या बांधकामामुळे स्तुपाला भेगा पडू शकतात. स्तूप पडू शकतो. सरकारने बांधकाम थांबवावं. आणि या बाबतची माहिती उद्या द्यावी, अशी मागणी नितीन राऊत यांनी केली. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची सविस्तर माहिती उद्या सभागृहात देणार असल्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर नितीन राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. दरवर्षी दीक्षाभूमीवर 10 ते 12 लाख लोक येतात. त्या ठिकाणी 50 हजारांपेक्षा अधिक गाड्या येतात. हा स्तूप क्रांतीचं प्रतिक आहे. त्या ठिकाणची माती लोक कपाळाला लावतात. तिथे कोणतंही काम करण्यापूर्वी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. नागपूरचा माजी पालकमंत्री या नेत्याने आम्ही शनिवारी प्रशासनाला विचारणा याबाबतचा जाब करणार आहोत. उद्रेक का झाला? हे विचारणार आहोत. स्तूपाला धोका निर्माण झालाय. मोठा खेळ खेळला जात आहे. त्याचा निषेध करतो, असं नितीन राऊत म्हणाले.
पावणे चार एकर जागा द्या
त्या ठिकाणी पार्किंग करू नका. पार्किंगच हवी असले तर या परिसरात पुढे पावणेचार एकरची जागा आहे. ती दीक्षाभूमीला द्या. त्यामुळे तिथे पार्किंगची व्यवस्था केली जाईल, असं रिपाइं (खरात गट)नेते सचिन खरात यांनी म्हटलं आहे.
दीक्षाभूमीचं कमर्शियलायजेशन सुरू
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पार्किंग होणार हे जाहीर झाल्यापासून लोकांनी विरोध केला आहे. जनतेने विरोध करूनही बांधकाम सुरू करण्यात आलं. दीक्षाभूमीवर आंदोलन सुरू आहे. काम थांबवलं पाहिजे. ट्रस्टींनी लोकांच्या भावना का जाणून घेतल्या नाही? विजयादशमीला दीक्षाभूमीवर लाखो येतात. त्यांनी कधीच पार्किंगला जागा मिळत नाही, अशी तक्रार केली नाही. दीक्षाभूमीचं कमर्शियलायजेशन सुरू आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
भावनेशी खेळू नका
दीक्षाभूमी, नागपूर येथे कुठलीही पार्किंगची मागणी नसतांना ट्रस्टींनी त्याचा घाट घातला. याविरोधात जनता उतरली आहे. ट्रस्टीनी लोकांच्या भावनेशी खेळू नये. आमचाही या पार्किंगला विरोध आहे. आंदोलनकारी जनतेच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी आहे, असंही आंबेडकर म्हणाले.
दीक्षाभूमीला डिस्टर्ब करु नका
जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बौद्ध अनुयायांना विश्वासात न घेता श्रद्धास्थानाला धक्का लावण्याचं काम सुरू आहे. नको ते करायला जाता कशाला? ताबडतोब काम थांबवा. दीक्षाभूमीला डिसर्टब करु नका. तुम्हाला काय करायच ते तुम्ही कस्तुरचंद पार्कमध्ये जाऊन करा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.