नांदेड: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची आज बीकेसीवर सभा होत आहे. तब्बल अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, त्याचबरोबर आणखी एक शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या औरंगाबादच्या सभेला ज्या अटी आणि शर्ती लावल्या होत्या, त्याच अटी आणि शर्ती उद्धव ठाकरे यांच्या सभेला लावण्यात आल्या आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला अवघे काही तास उरलेले असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या या प्रतिक्रियेमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला जे नियम आणि अटी लागू केल्या होत्या, त्याच अटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला लागू होणार का? असा सवाल दिलीप वळसे पाटील यांना करण्यात आला होता. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याही सभेवरही पोलिसांचं लक्ष राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट शेअर केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या गोष्टी जाणूनबुजून आणि ठरवून केल्या जात आहेत. याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थोडी तरी हिंदुत्वाची जाण असेल तर त्यांनी सभेची सुरुवात हनुमान चालिसाने करावी, असं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं होतं. त्यावर मात्र वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही. ते फार महान लोक आहेत, असं त्यांनी सांगितलं.