दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट; पोलीस वडिलांचा जबाब नोंदवण्याची शक्यता
दिशा सालियन प्रकरणात हाय -कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षांनी हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या प्रकरणात मालवणी पोलीस उद्या दिशाच्या वडिलांचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.

दिशा सालियन प्रकरणात हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षांनंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. या याचिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसत आहे. दरम्यान या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मालवणी पोलीस उद्या दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. उद्या सतीश सालियन मालवणी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांचा जबाब नोंदवू शकतात. शनिवारी सतीश सालियन यांच्या वकिलाचे एक पथक मालवणी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि तिथे त्यांंनी पुराव्याची मागणी केली होती. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी सतीश सालियन यांनी आपल्या याचिकेमध्ये केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक देखील झाली आहे.
राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात या प्रकरणात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसत आहे. शनिवारी भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठा दावा केला. या प्रकरणात आपल्याला उद्धव ठाकरे यांचे दोन फोन आले होते, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात सालियन कुटुंबावर दबाव होता, त्यांना त्यावेळी पोलिसांनी सहकार्य केलं नाही, असा आरोपही राणे यांनी केला.
दरम्यान दुसरीकडे मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून नारायण राणे यांचे हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. उलट राणेंना जेव्हा अटक झाली होती तेव्हा उद्धव ठाकरे यांना फोन करण्यात आला होता असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.