दिशा सालियनप्रकरणी विधान परिषदेत घमासान, SIT अहवाल लवकरात लवकर सादर करण्याची मागणी
आता याप्रकरणी तिच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत, त्यानुसार आम्ही कारवाई करु, असे योगेश कदम म्हणाले.

सेलिबेट्री मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी नवीन ट्विस्ट आला आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आता या प्रकरणावरुन विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला. याप्रकरणी अमित साटम, अर्जून खोतकर, नितेश राणे, योगेश कदम आणि शंभूराज देसाई यांनी भाष्य केले.
आमदार अमित साटम यांनी नुकतंच दिशा सालियन प्रकरणी विधानसभेत मागणी केली. दिशा सालियानच्या वडिलांनी ज्या ज्या व्यक्तींची नाव घेतली आहेत या सर्वांची चौकशी एसआयटी करणार का, गरज पडली तर यांना कस्टडीत चौकशी करणार का, असा सवाल त्यांनी विधानसभेत केला. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत, त्यानुसार आम्ही कारवाई करु, असे म्हटले.
अमित साटम काय म्हणाले?
“दिशा सालियान प्रकरणी २०२२ मध्ये एसआयटी चौकशी नेमली होती. तिच्या संशयास्पद मृत्यूबद्दल देशभरात नव्हे तर जगाभरात संभ्रमाचे वातावरण तयार झालेले आहे. यामुळे तिचा संशयास्पद मृत्यू होण्यापूर्वी कोणतीही पार्टी झाली होती का, त्या पार्टीत कोण कोण सहभागी होते, कोणत्या विषयामध्ये तिचा मृत्यू झाला किंवा खून झाला या संदर्भात विविध प्रकारचे प्रवाद हे समोर येत आहेत. एसआयटी चौकशी नेमून दोन वर्ष उलटली असली तरी अद्याप याबद्दलचा कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही”, असे अमित साटम म्हणाले.
“दिशा सालियानच्या वडिलांनी काही आरोप केले आहेत. दिशा सालियानचा बलात्कार करुन खून करण्यात आला, असा संशय त्यांना आलेला असून त्या संदर्भात त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाविकासाआघाडी सरकारने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप त्यांनी केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या कुटुंबावर दबाव आणला. याबद्दलची चौकशी मागण्यापासून रोखलं. पण त्यांची खात्री आहे की त्यांच्या कन्येवर बलात्कार करुन खून करण्यात आलेला आहे. त्यावेळी शासनामध्ये असलेले मंत्री त्याला जबाबदार आहे. महाविकासआघाडीतील एका मंत्र्याचा यात सहभाग असून त्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे”, ही फार गंभीर बाब आहे.
“यासंदर्भात माझी शासनाला विनंती आहे की, डिसेंबर २०२२ मध्ये एसआयटी चौकशीमध्ये काय निष्कर्ष आला, हे कधीपर्यंत देशाच्या समोर येणार आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी ज्या ज्या व्यक्तींची नाव घेतली आहेत या सर्वांची चौकशी एसआयटी करणार का, गरज पडली तर यांना कस्टडीत चौकशी करणार का हा माझा प्रश्न आहे”, असेही अमित साटम यांनी म्हटले.
योगेश कदम काय म्हणाले?
याप्रकरणानंतर आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याप्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत अजूनही सुरु आहे. अहवाल अजूनही मिळालेला नाही ही वस्तूस्थिती आहे. आता ही चौकशी अजून गतीने केली जाईल. पण आता याप्रकरणी तिच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत, त्यानुसार आम्ही कारवाई करु, असे योगेश कदम म्हणाले.