आधी त्यांचे आले, मग यांचेही, चौकावर दोन्ही बाजूने घोषणाबाजी, मग आमनेसामने, मिरजेत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हात्यात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर म्हणून घोषणाबाजी केली.
सांगली : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत दिलेल्या निकालावरुन महाराष्ट्रात शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु झाल्याचं चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजेत (Miraj) आज तशा घटनेची पुनरावृत्ती झालीय. दोन दिवसांपूर्वी पुण्यात तशीच घटना घडलेली. याशिवाय कोकणातही तशीच एक घटना समोर आलेली. मिरजेत आज घडलेल्या घटनेमुळे काही काळासाठी तणावाचं वातावरण होतं. पण पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. पण संबंधित घटनेमुळे मिरजेत खळबळ उडाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निकालानुसार धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मिळालंय. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात मिरजेत उद्धव ठाकरे गट आंदोलन करण्यासाठी महाराणा प्रताप चौक या ठिकाणी जमला. तर दुसरीकडे शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील त्याचठिकाणी जमा झाले.
दोन्ही गटांची समोरासमोर घोषणाबाजी सुरू केली. ते एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. विशेष म्हणजे त्यांची ही घोषणाबाजी हाणामारीपर्यंत जाऊ शकली असती. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांना या गोष्टीची भनक लागली. त्यामुळे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मोठा अनर्थ टळला.
मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी यशस्वी मध्यस्थी करून दोन्ही गटांना बाजूला केले. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात तसेच केंद्र सरकारविरोधात निषेधाच्या घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले.
यावेळी ठाकरे गटाचे शहराध्यक्ष चंद्रकांत मैंगुरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुजाता इंगळे, सुनीता मोरे, सुगंधा माने,मीनाक्षी पाटील, तानाजी सातपुते, पप्पू शिंदे, महादेव हुलवान, अतुल रसाळ, कुबेर सिंग राजपूत, किरण कांबळे, केदार गुरव तसेच महिला आघाडी आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.
पुण्यात अजित पवारांच्या रॅलीत गोंधळ
विशेष म्हणजे सांगली येथील घडामोड ताजी असताना पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या रॅलीत गोंधळ उडाला. कसब्या काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत अजित पवार आणि बाळासाहेब थोरात सोबत उपस्थित होते. विशेष म्हणजे ही रॅली ज्या परिसरातून जात होती तिथून काही अंतरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु होती.
या बैठकीला भाजप आणि शिवसेनेचे देखील कार्यकर्ते होते. ही रॅली संबंधित परिसरातून जात असताना तेव्ही भाजप, शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचं वातारण निर्माण झालं. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंचं गाणं डिजेवर लावलं. यावेळी पोलिसांनी गोंधळावर नियंत्रण मिळवलं.