जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी? पवार, ठाकरे सोबत कॉंग्रेस एकाकी?
प्राथमिक चर्चेनुसार महाविकास आघाडीत लोकसभेला ठाकरे गट एकोणीस ते एकवीस जागा, काँग्रेस तेरा ते पंधरा जागा आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी दहा ते अकरा जागा लढवू शकते. स्थानिक पातळीवर जागांची दावेदारी आणि इशारेही सुरू झाले आहेत.
मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : आघाडीमध्ये संभाव्य फॉर्म्युल्याची चर्चा आहे मात्र कॉंग्रेस जागा वाटपासाठी पाच डिसेंबरची वाट बघतंय. कारण, पाच राज्याच्या निकालानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस स्वतःच बळ दाखवणार आहे. काँग्रेसला फॉर्म्युला अमान्य झाला तर ठाकरे आणि पवार गट एकत्रित निवडणूक लढणार. बार्गेनिंग पॉवरसाठी काँग्रेसला तीन डिसेंबरची प्रतीक्षा आहे. महाविकास आघाडी जागांचा फॉर्म्युला ठरणार असे बोललं जातंय. मात्र, या चर्चेत काँग्रेस अद्यापही निरुत्साही दिसतेय. सूत्रांच्या माहितीनुसार तीन डिसेंबरनंतर काँग्रेस महाराष्ट्रातल्या जागावाटपात अधिकृतपणे दावा करेल.
सुत्रांनुसार महाविकास आघाडीत काँग्रेसला अपेक्षित जागा न मिळाल्यास ठाकरे गट आणि शरद पवारांचा गटही एकत्रित लढू शकतो. प्राथमिक चर्चेनुसार महाविकास आघाडीत लोकसभेला ठाकरे गट एकोणीस ते एकवीस जागा, काँग्रेस तेरा ते पंधरा जागा आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी दहा ते अकरा जागा लढवू शकते. मात्र, या संभाव्य फॉर्म्युल्यावर फेर विचारला बळ मिळावं म्हणून काँग्रेस तीन डिसेंबरनंतर या चर्चेत जागांचा दावा करू शकते.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डिसेंबर महिन्यामध्ये राहुलजी गांधी महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. त्याची तयारी सुरू झालेली आहे. त्याची जागा पण कुठं कुठं करायची आहे त्या पण आम्ही जवळपास निश्चित करत आहे. एकोणतीस तारखेनंतर याच महिन्यात काही पक्ष प्रवेश होणार आहेत. त्यावेळी त्या पद्धतीची आमची तयारी सुरू झालेली आहे हे लक्षात येईल असे त्यांनी म्हटलंय.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सुरुवातीला हा प्रश्न सोडवलेला आहे. ज्या जागेवर ज्या पक्षाच्या निवडून आल्यात त्या जागा त्या पक्षाकडे राहतीलच. तरीसुद्धा मेरीटवर एखादा उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असेल तर त्याबाबत बदल करण्याची तयारी ठेवली पाहिजे. हे मत मत आम्ही मांडले होते आणि ते सर्वांनी स्वीकारलेलं आहे’, असे मत मांडलंय.
दरम्यान, स्थानिक पातळीवर जागांची दावेदारी आणि इशारेही सुरू झाले आहेत. रावेर लोकसभेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ही जागा काँग्रेसचं लढणार आणि तसं न झाल्यास आघाडीत बिघाडी होण्याचा इशारा रावेरमधले काँग्रेसचे नेते उल्हास पाटलांनी दिलाय. त्यामुळे तूर्तास तरी महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचं अंतिम चित्र पाच राज्यांच्या निकालानंतर स्पष्ट होण्याची चिन्ह आहेत. निकालानंतर काँग्रेसची भूमिका काय असेल? यावरही अनेक गणितं ठरणार आहेत.