थर्टी फस्टसाठी पुण्यात पबकडून कंडोमचं वाटप; आता राज्य महिला आयोग अॅक्शन मोडवर
पुण्यातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे, थर्टी फस्टचं निमंत्रण देताना ‘हाय स्पिरीट’ पबकडून कंडोम आणि ओआरएसच्या पाकिटांचं वाटप करण्यात आलं होतं, आता या प्रकरणाची दखल महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे.
असं म्हणतात पुणे तिथे काय उणे, याच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे पुण्यातील एका पबनं थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनचं निमंत्रण देताना चक्क कंडोम आणि ओआरएसच्या पाकिटांचं वाटप केलं. या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगली, त्यानंतर आता राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
‘पुण्यातील मुंढवा परिसरातील हाय स्पिरीट पबकडून गैरकृत्य केल्याबाबतची बातमी माध्यमातून समोर आली आहे. याची दखल घेत राज्य महिला आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना सदर प्रकरणी तथ्य जाणून वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत’ असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.
पुण्यातील मुंढवा परिसरातील हाय स्पिरीट पबकडून गैरकृत्य केल्याबाबतची बातमी माध्यमातून समोर आली आहे. याची दखल घेत राज्य महिला आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना सदर प्रकरणी तथ्य जाणून वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. @PuneCityPolice
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) December 31, 2024
राज्यात सर्वत्र थर्टी फस्टचा उत्साह आहे, नव वर्षाच्या स्वागतासाठी लोक अतुर झालेले आहेत. नव वर्षाचं स्वागत कसं करायचं याचं प्रत्येक जण प्लॅनिंग बनवत असतो. आपलं सेलिब्रेशन हे इतरांपेक्षा युनिक पद्धतीनं झालं पाहिजे यावर देखील अनेकांचा भर असतो. काही जण घरातच नव वर्षाचं सेलिब्रेशन करतात तर काही जण हॉटेल, पब अशा महागड्या ठिकाणी जाऊन नव वर्षाचं स्वागत करतात.
अनेक जण तर नव वर्षाच्या स्वागतासाठी कुठे एखाद्या दूरवरच्या पर्यटनस्थळी जाण्याचा बेत देखील आखतात. दरम्यान या काळात हॉटेल आणि पबला देखील मोठी मागणी असल्यामुळे आपल्याकडे गर्दी खेचण्यासाठी किंवा चर्चेत येण्यासाठी अशा हॉटेल आणि पबकडून देखील वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर केला जातो.
सध्या पुण्याच्या मुंढवा परिसरात असलेला हाय स्पिरीट पब चांगलाच चर्चेत आला आहे. या पबकडून थर्टी फस्टचं आमंत्रण देताना चक्क कंडोम आणि ओआरएसची पाकिटं वाटण्यात आली. त्यानंतर आता राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.