पुणे – शिवाजी पार्कात होणाऱ्या दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava)सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची शिवसेना आणि शिंदे गटात ( Shinde group)शाब्दिक चकमकी सुरु आहेत. दोन्ही बाजूंकडून दसरा मेळावा आमच्याच पक्षाचा होणार, अशी वक्तव्ये करण्यात येत आहेत. यावरुन शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी पुण्यात शिंदे गटाला उत्तर दिले आहे. मुंबईत दसरा मेळावा हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच होऊ शकतो, हे पूर्ण राज्याला माहित असल्याचे अहिर म्हणाले आहेत. जे दावे करतात त्यांच्यात दसरा मेळावा घेण्याची हिम्मत आहे का, असे आव्हानच त्यांनी शिंदे गटाला दिले आहे.
दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होतो आणि शिवसेनेचाच होणार असे सचिन अहिर यांनी ठासून सांगितले आहे. कुणी काहीही म्हणाले तरी, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच दसरा मेळावा होणार असल्याचे अहिर यांनी स्पष्ट केले आहे.
जे नेते आपल्या स्वार्थासाठी वारंवार इकडे तिकडे करत होते त्यांना माझा आव्हान आहे की, आमचा जिल्हाप्रमुख पाठवतो त्याच्यासमोर निवडून या, असे आव्हानही सचिन अहिर यांनी शिंदे गटातील आमदारांना दिले आहे.
गुवाहाटीफेम शहाजीबापू पाटील यांनी याबाबत वक्तव्य करत, शिवाजी पार्कवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा व्हावा, असे विधान केले होते. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी प्रामाणिक राहून शिंदे गटाची शिवसेना कार्य करीत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. उद्धव ठाकरेंनी जर बाळासाहेबांचे विचार जपले असते तर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली असती का, असा सावलही त्यांनी उपस्थित केला होता.
भाजपा आणि मनसे येत्या काळात युती करतील का, या प्रश्नावर त्यांनी दोन्ही पक्षांवर टीका केली आहे. युती करण्याची गरज नाही त्यांची छुपी युती आधीपासून असल्याचे त्यांनी सांगितले. हे आज झालेले नाही, भाजपासाठी मनसेने आधीपासूनच मशिदीसमोर भोंगे वाजवण्याची भूमिका घेतली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. राज ठाकरे यांची नाराजी दूर करण्यासाठी कधी विनोद तावडे तर कधी आशिष शेलार हे शिवतीर्थावर जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
या भाजपा-मनसे छुप्या युतीचा सामना करण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.