या गल्लीत की त्या गल्लीत… भिडे गुरुजींना चावताच कुत्र्यांच्या मागे पालिका कर्मचारी, धरपकड आणि दमछाक
याआधीही भटक्या कुत्र्यांनी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, सकाळी फिरायला गेलेले लोक यांच्यावर हल्ला केलेला तसेच चावा घेतलेला आहे.

Sambhaji Bhide Dog Bite : संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्यानंतर सांगलीचे पालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. महापालिकेच्या डॉग व्हॅनकडून सकाळपासून कुत्रे पकडण्याची मोहीम चालू आहे. आतापर्यंत अनेक कुत्रे पालिकेने पकडले आहेत. भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम आता युद्धपातळीवर चालू आहे. संभाजी भिडे यांना सांगलीतील माळीगल्लीत कुत्रा चावला होता.
कुत्रीला चार पिल्ले, हल्ला होणार म्हणून…
महापालिकेचे कर्मचारी माळीगल्लीमध्ये पोहोचले आहेत. या कर्मचाऱ्यांकडून आता गल्लीतील सर्व भटकी कुत्रे पकडण्याची मोहीम राबवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार संभाजी भिडे यांचा चावा एका कुत्रीने घेतला आहे. या कुत्रीला एकूण चार पिलं आहे. भिडे गुरुजी माझ्यावर हल्ला करत आहेत, असा समज या कुत्रीचा झाला. त्यानंतर कुत्रीने स्वसंरक्षणार्थ भिडे गुरुजी यांच्या डाव्या पायाला चावा घेतला.
आतापर्यंत अनेक नागरिकांना चावा
याआधीही भटक्या कुत्र्यांनी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, सकाळी फिरायला गेलेले लोक यांच्यावर हल्ला केलेला तसेच चावा घेतलेला आहे. मात्र पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं होतं. आता मात्र भिडे यांना कुत्रा चावल्यामुळे पालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे.
संभाजी भिडे यांची प्रकृती सध्या कशी आहे?
संभाजी भिडे यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. त्यांना औषध आणि गोळ्या दिल्या जात आहेत. त्यांची प्रकृती सध्या चांगली आहे. दुसरीकडे भिडे यांना कुत्रा चावल्यामुळे राजकीय वर्तुळातही वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. काय त्या कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली, कुणाला चावावं कळलं नाही याचं वाईट वाटतं. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो, मात्र या प्रामाणिक प्राण्याने का राग धरला याची एसआयटी चौकशी केली पाहिजे, अशी खोचक प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
नेमकं काय घडलं होतं? कुत्रीने चावा कसा घेतला?
संभाजी गिडे हे सांगलीतील माळी गल्लीत गेले होते. त्यांना एका धारकऱ्याच्या घरी जेवणाचे आमंत्रण होते. मात्र जेवून परतताना त्यांचा एका कुत्रीने चावा घेतला. या कुत्रीने भिडे यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. या घटनेनंतर भिडे यांना तत्काळ सांगलीतील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही घटना घडल्यानंतर पालिकेने माळी गल्लीतील भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबवली आहे. आतापर्यंत अनेक कुत्र्यांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पकडले आहे.