आधी बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर हात टाकला, पुन्हा नग्न करून झडती, प्रसिद्ध रिलस्टारच्या कारनाम्याने डोंबिवली हादरली
डोंबिवलीतील प्रसिद्ध रील स्टार सुरेंद्र पाटील यांच्यावर पुण्यातील एका तरुणीने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. एअरहोस्टेसच्या नोकरीचे आमिष दाखवून त्याने तरुणीवर बलात्कार केल्याचा आणि अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे.

डोंबिवलीतील चर्चित रील स्टार आणि बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील याच्या विरोधात बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील एका तरुणीला मुंबई एअरपोर्टवर एअरहोस्टेसची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्याने तिला बंदुकीचा धाक दाखवला. या बंदुकीच्या धाकावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही, तर पुन्हा ऑफिसमध्ये बोलावून तिच्यावर अश्लील कृत्य केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. हा गुन्हा दाखल होताच सुरेंद्र पाटील पसार झाला आहे. सध्या मानपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मुंबई एअरपोर्टवर एअरहोस्टेसची नोकरी मिळवून देण्याचे आमिष
डोंबिवलीतील वादग्रस्त रील स्टार सुरेंद्र पाटील याच्यावर आणखी एका गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुण्यातील एका तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सुरेंद्र पाटील याने तिला मुंबई एअरपोर्टवर एअरहोस्टेसची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तिला कागदपत्रांसाठी डोंबिवलीतील आपल्या ऑफिसमध्ये बोलावले. तरुणी ऑफिसमध्ये पोहोचताच त्याने तिला एका खोलीत नेले. बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. तसेच, हा प्रकार कुठेही सांगितल्यास तिच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली.
सुरेंद्र पाटीलच्या ड्रायव्हरने देखील अश्लील कृत्य केले
काही दिवसांनी, पुन्हा कागदपत्रांसाठी बोलावून त्याने बलात्काराचा प्रयत्न केला. विरोध केल्यावर तिला चोरीचा आळ लावत नग्न करून झडती घेण्याच्या बहाण्याने अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात सुरेंद्र पाटीलच्या ड्रायव्हरने देखील अश्लील कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी सुरेंद्र पाटील सध्या फरार आहे. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर रील स्टार म्हणून चर्चेत असलेल्या सुरेंद्र पाटीलच्या या गंभीर कृत्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. याआधीही तो पोलिसांच्या खुर्चीत बसून रील बनवल्यामुळे वादात सापडला होता. मात्र, आता त्याच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्याने पोलिसांची कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.