दोन बलात्कार, तब्बल 14 विविध गुन्हे… प्रसिद्ध रिल्स स्टार सुरेंद्र पाटीलला अटक, पोलिसांनी अशाप्रकारे रचला सापळा
डोंबिवलीतील दोन बलात्कार प्रकरणांतील फरार आरोपी, सोशल मीडियावरील 'रिल्स स्टार' सुरेंद्र पाटील याला नाशिकमधून ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर मानपाडा आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत.

डोंबिवलीतील दोन बलात्कार प्रकरणांमध्ये फरार असलेला आणि सोशल मीडियावर ‘रिल्स स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेला सुरेंद्र पाटीलला अखेर पोलिसांनी अट केली आहे. सुरेंद्र पाटील याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नाशिकमधून अटक केली आहे. मानपाडा आणि टिळकनगर पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल होते. तब्बल पाच तपास पथके त्याच्या शोधात होती.
दोन वेगवेगळे बलात्काराचे गुन्हे दाखल
सोशल मिडिया ‘रिल्स स्टार’ सुरेंद्र पांडुरंग पाटील याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नाशिकमधून अटक केली आहे. डोंबिवलीतील मानपाडा आणि टिळकनगर पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरोधात दोन वेगवेगळ्या बलात्काराचे गुन्हे दाखल होते. गुन्हे दाखल झाल्यापासून तो फरार होता. मानपाडा पोलीस ठाण्यात एका तरुणीला मुंबई एअरपोर्टमध्ये एअर होस्टेस म्हणून नोकरीला लावतो असे सांगत बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.
मशीन परत देण्याच्या बहाण्याने वारंवार बलात्कार
तर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात एका घटस्फोटीत महिलेने सुरेंद्र पाटीलविरोधात तक्रार केली होती. त्या पीडित महिलेला व्यवसायात नुकसान झाले होते. ती सुरेंद्र पाटील यांच्या गाळ्यात व्यवसाय करत होती. त्याने त्याच्या गाळ्याचे थकवलेले भाडे माफ केले होते. यानंतर त्याने त्या महिलेला द्रोण व कागदाचे प्लेट बनवण्याची मशीन परत देण्याच्या बहाण्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. अशा स्वरुपाचा एक गुन्हा दाखल होता.
हे दोन गुन्हे दाखल होताच सुरेंद्र पाटील हा डोंबिवलीमधून फरार होता. मात्र तो नाशिकमधील हॉटेल सेलिब्रेशनमध्ये लपून बसल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या खबऱ्याकडून खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून खंडणी पथकाने इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने त्याला काल रात्री ८ वाजता बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला पुढील तपासासाठी मानपाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
तब्बल 14 गुन्हे दाखल
विशेष म्हणजे सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात याआधी देखील कल्याण डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्यात फसवणूक, वीज चोरी, अवैधरित्या घातक शस्त्र, बंदूक बाळगणे असे तब्बल 14 गुन्हे दाखल आहेत. इतकेच नाही तर या आधी पोलिसांनी त्याला दीड वर्षांसाठी तडीपार देखील केले होते मात्र तो न्यायालयमधून तडीपारी रद्द करत पुन्हा या ठिकाणी वावरत होता. सध्या त्याच्या अटकेने पोलिसांना मोठे यश आले आहे. या नराधमाने किती महिलांवर अत्याचार केले याचा तपास पोलीस करत आहे.